

Indian wheelchair cricket team
नायगाव : सुजलेगावचा सुपुत्र सुभाष भिमराव सज्जन यांनी संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव उज्वल केले आहे. अत्यंत कमी वयात भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाच्या संघ व्यवस्थापक (Team Manager) पदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे.
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया (DCCBI) व उमंग गौरवदीप वेल्फेअर सोसायटी, भोपाल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ ते ११ डिसेंबर दरम्यान भोपाल (मध्यप्रदेश) येथील ओल्ड कॅम्पियन मैदानावर आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि नेपाल या तीन देशांचे संघ सहभागी झाले होते.
या मालिकेत भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून सुभाष सज्जन यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांनी संघाचे व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध आणि कुशलतेने सांभाळले. अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत मालिका जिंकून चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची दखल घेत DCCBI निवड समिती तसेच भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार रमेश सरतापे, उपकर्णधार परशुराम देसले, यष्टिरक्षक शाहीद अन्सारी आणि प्रशिक्षक मनीष शर्मा यांनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली होती. त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत भारतीय संघाला विजयी बनवले.
देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न अखेर साकार झाल्याची भावना व्यक्त करत सुभाष सज्जन यांचा हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे सुजलेगाव, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर आणि त्यांच्या आई-वडिलांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.