

Nanded railway project minor minerals irregularities
उमरखेड : वर्धा - यवतमाळ - नांदेड या रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज गैरप्रकार प्रकरणी ईटीएस मोजणी करुन दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान दिनांक 11 डिसेंबर रोजी आयोजित बैठकीत बनसोडे यांनी उपस्थित अधिका-यांना हे आदेश दिले.
वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांचा गौण खनीज घोटाळा चांगलाच गाजत आहे. सदर प्रकरणातील जबाबदार अधिका-यांची बैठक विधानसभा उपाध्यक्षांनी नागपूर अधिवेशन दरम्यान बोलविली होती. ईटीएस मोजणीचे आदेश दिले असतांना टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे अधिका-यांना जाब विचारण्यात आला. एवढेच नव्हे तर येत्या दोन महिन्यात ईटीएस मोजणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
अहवाल सादर न केल्यास जबाबदार अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुध्दा अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची विधानसभा उपाध्यक्षांनी गंभीर दखल घेतली असून जबाबदार अधिका-यांविरुध्द ठोस कारवाई होण्याचे चिन्हे दिसून येत आहे. सुरुवातीला ईटीएस मोजणीवरुन टाळाटाळ तसेच कारवाईबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अण्णा बनसोडे यांनी ठामपणे ईटीएस मोजणीचे आदेश दिले.
वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सुध्दा करीत आहे. दुसरीकडे या प्रकरणाची सुनावणी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात सुरु आहे. सदर प्रकरणात यवतमाळच्या जिल्हाधिका-यांना सविस्तर अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश जुलै महिन्यात देण्यात आले होते. मात्र, चार महिने झाले तरी अहवाल सादर न झाल्याने उपाध्यक्षांनी संताप व्यक्त केला.
पुसद, उमरखेड भागात काही मोजक्या प्रकरणात गौण खनीज खरेदी करणा-यांवर कारवाई करण्यात आली मात्र विक्रेत्यांवर झाली नसल्याचे स्पष्ट झाले. हा घोटाळा जवळपास 12 हजार कोटी रुपयांचा असल्याचा तक्रारकर्ते अमोल कोमावार यांचा दावा आहे.
या बैठकीला यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा खनीकर्म अधिकारी संजय जोशी, पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, उमरखेड येथील तहसिलदार सुरडकर, पुसदचे तहसिलदार महादेव जोरेवर, तहसिलदार कळंब तसेच यवतमाळचे तत्कालील तहसिलदार कुणाल झाल्टे तसेच आरव्हीएनएल चे अधिकारी तसेच तक्रारकर्ते अमोल कोमावार उपस्थित होते.
संयुक्त मोजणीचे निर्देश
कळंब पासून पुसद पर्यन्त संपुर्ण गौण खनीज उत्खननाची ईटीएस मोजणी संयुक्तपणे करण्याचे आदेश दिले आहे. यामध्ये तहसिलदार, मंडळ अधिकारी, भूमि अभिलेख विभाग, रेल विकास निगम यांनी एकत्रित नियोजन करुन दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहे. दोन महिन्यात अहवाल न दिल्यास अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याने जबाबदार अधिकारी, कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.