

Postal Department My Stamp Scheme
उमरखेड : टपाल तिकीट म्हटले की राष्ट्रपुरुष, ऐतिहासिक स्थळे, वन्यजीव किंवा महत्त्वाच्या घटनांची छायाचित्रे डोळ्यांसमोर येतात. मात्र आता आपला स्वतःचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा फोटो टपाल तिकिटावर झळकवता येणार आहे. भारतीय टपाल विभागाने ‘माय स्टॅम्प’ ही वैशिष्ट्यपूर्ण योजना पुन्हा सुरू केली असून, अवघ्या ३०० रुपयांत १२ वैयक्तिकृत टपाल तिकिटांचा संच मिळणार आहे.
वाढदिवस, लग्नसमारंभ, विवाहाचा वाढदिवस, सेवानिवृत्ती, कौटुंबिक सोहळे किंवा एखाद्या खास व्यक्तीला आयुष्यभर जपून ठेवता येईल अशी आठवण भेट देण्यासाठी ‘माय स्टॅम्प’ हा अनोखा पर्याय ठरत आहे. विशेष म्हणजे या तिकिटावर स्वतःचा, प्रियजनांचा किंवा आवडत्या व्यक्तीचा फोटो तसेच कंपनीचा लोगो छापता येतो.
‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत कोणत्याही टपाल कार्यालयातून वैयक्तिकृत टपाल तिकीट तयार करून घेता येते. ३०० रुपयांत १२ तिकिटांचा संच उपलब्ध करून दिला जातो. या तिकिटांचा वापर नियमानुसार टपाल व्यवहारासाठी करता येत असल्याने, हे केवळ स्मरणिका न राहता प्रत्यक्ष पत्रव्यवहाराचाही भाग बनते.
एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त तिच्याच छायाचित्राचे टपाल तिकीट तयार करून देणे, नवविवाहित जोडप्याच्या फोटोचे तिकीट काढणे किंवा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने खास तिकीट तयार करणे, अशा विविध कारणांसाठी या योजनेचा उपयोग करता येतो. त्यामुळे नेहमीच्या शुभेच्छापत्रांपेक्षा ‘माय स्टॅम्प’ ही आठवण जपून ठेवण्याजोगी आगळीवेगळी भेट ठरू शकते.
‘माय स्टॅम्प’ काढण्यासाठी संबंधित टपाल कार्यालयात शासनमान्य ओळखपत्रासह आवश्यक अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी यासह आवश्यक माहिती द्यावी लागते. ज्या व्यक्तीचा फोटो तिकिटावर छापायचा आहे, त्या व्यक्तीची समक्ष उपस्थिती आवश्यक असल्याचे टपाल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
टपाल खात्याच्या या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांनाही स्वतःच्या आठवणीला टपाल तिकिटाच्या रूपात जतन करण्याची संधी मिळाली आहे. डिजिटल युगातही पत्र, तिकीट आणि आठवणी यांचे नाते कायम ठेवणारा हा उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.
ही योजना अधीक्षक, डाकघर यवतमाळ यांच्या कार्यालया मार्फत सुरु आहे. स्थानिक पोस्ट ऑफिस शी संपर्क केला, तरी माय स्डॅप उपलब्ध करुन देता येतील. या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा
- प्रकाश आगोशे, व्यवस्थापक, उप डाक कार्यालय, उमरखेड