

नांदेड ः राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे नांदेड शहरात दाखल होताच मुदखेड येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात हायवाच्या धडकेत आणखी एक बळी घेतल्याने वाळू माफियांनी महसूल मंत्र्यांना दुर्दैवी सलाम ठोकल्याची बाब समोर आली असून त्यामुळे निष्क्रिय ठरलेल्या जिल्हा महसूल प्रशासनाचे पितळच उघडे पडले आहे.
बारड वरून मुदखेड येत असताना सीता नदी वळणावर सुसाट वेगात मागून येणाऱ्या अवैध वाळू वाहतूकीच्या अज्ञात हायवा एमएच 20, एझड 174 या नंबरच्या दुचाकीस अक्षरशः चिरडून निघून गेला. यावेळी दुचाकीस्वार संतोष टाक यांचे जागीच दोन्ही पाय निकामी झाले असता त्यांना नांदेड येथे निर्मल रुग्णालयात दाखल होते, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बाब समोर आली. त्यामुळे वाळू माफियांच्या बेलगाम वृत्तीमुळे आणि त्यांना रोखण्यात कमी पडलेल्या महसूल व पोलीस प्रशासनाच्या बेजबाबदारपणामूळे संतोष टाक यांचा मृत्यू झाला आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटल्या आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर मुदखेड शहरवासियांनी आज बुधवार रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वरील घटनेनंतर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पसार झाल्याने अज्ञात खूनी हायवाचा शोध घेण्यात निष्प्रभ ठरलेले पोलीस प्रशासन हातावर हात ठेवून बसलेले आहे. तालुक्यात शंखतीर्थ आणि वासरी हे दोन्हीही गोदावरीचे घाट वाळू माफीयांना आंदन म्हणून दिले आहेत. या संदर्भात दै. पुढारीने ता. 14 डिसेंबर रोजीच विस्तृत वृत्त प्रकाशित केले होते. परंतु येथील बोटांना प्रशासनाचे सुरक्षा कवच असल्यानेच वाळू माफीयांनी येथून वाळू उपासा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागच्या काही दिवसात हायवाच्या धडकेत चौथा बळी गेला आहे.
या अगोदर मुदखेड तालुक्यात शालेय बसला टिप्पर धडकले होते. बेलगाम आणि मुजोर वाळू माफीयांपुढे प्रशासनाने अक्षरशः गुडघे टेकल्याने अजून किती बळी जाणार आहेत? याची चिंता मुदखेड वासियांना लागली आहे.
मुदखेड शहरात आज बाजारपेठ बंद!
राष्ट्रीय हरित लवाद कडून मुदखेड तालुक्यात कायमस्वरूपी वाळू उपशाला बंदी असतानाही तेथील शंखतीर्थ, वासरी आणि टाकळी घाटातून वाळू उपसा सुरूच असतो. त्यामुळे तेथील पोलीस आणि महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यातच आता एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात हायवाच्या धडकेत संतोष टाक यांचा मृत्यू झाल्याने मुदखेडवासियांनी आज बाजारपेठ बंद ठेवून निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे आता तरी शंखतीर्थ आणि वासरी येथील वाळू घाट कायमस्वरूपी बंद होतील अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
इकडे प्रवेश सोहळा; तिकडे सोडला प्राण!
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रलोक हॉटेलमध्ये भाजपचा पक्षप्रवेश सोहळा सुरू असतानाच हायवाच्या धडकेत जखमी झालेल्या संतोष टाक यांनी निर्मल रुग्णालयात आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी बाब घडली. नांदेड शहरात महसूल मंत्री बावनकुळे उपस्थित असतानाच वाळू माफियांनी घातलेला धुडगूस चव्हाट्यावर आल्यानंतर तरी जिल्हा महसूल प्रशासन शंखतीर्थ आणि वासरी येथील वाळू घाटांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार का? हेच आता पहावे लागेल!
इकडे प्रवेश सोहळा; तिकडे सोडला प्राण!
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रलोक हॉटेलमध्ये भाजपचा पक्षप्रवेश सोहळा सुरू असतानाच हायवाच्या धडकेत जखमी झालेल्या संतोष टाक यांनी निर्मल रुग्णालयात आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी बाब घडली. नांदेड शहरात महसूल मंत्री बावनकुळे उपस्थित असतानाच वाळू माफियांनी घातलेला धुडगूस चव्हाट्यावर आल्यानंतर तरी जिल्हा महसूल प्रशासन शंखतीर्थ आणि वासरी येथील वाळू घाटांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार का? हेच आता पहावे लागेल!