

अहमदपूर : अहमदपूर तालुक्यात सध्या ‘पोलिसांच्या वेशातील’ भामट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांनी स्वतःला मी पोलीस आहे असे सांगून नागरिकांना फसवून त्यांचे दागिने आणि रोख रक्कम हडपण्याचे प्रकार राबवत आहेत. विशेषतः माळेगाव यात्रेच्या निमित्ताने अशा घटनांत वाढ झाली आहे. अशा पासून नागरीकांनी सावध रहावे तसेच पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद त्रेवार यांनी केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी लोकांना धोका आहे किंवा गुन्हेगारी वाढली आहे असे खोटे सांगून घाबरवते. याच संधीचा फायदा घेऊन हातचालाखीने नागरिकांचे दागिने व रोख रक्कम उचलली जाते. वयोवृद्ध नागरिक हे मुख्य लक्ष्य असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगून दागिने काढण्यास सांगितल्यास त्वरित नकार द्यावा. तसेच संशयित व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.सोन्याचे दागिने घालून फिरणे टाळावे आणि शक्य असल्यास रोख रक्कमही कमी ठेवावी.
नागरिकांनी अशा घटना झाल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांना 02381 2 62 100, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार (मोबाईल): 90499 86084 या क्रमांकावर माहिती द्यावी असे पोलिस प्रशासनाने कळवले आहे.