

Illegal sand mining continues at night despite ban
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मुदखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी शंखतीर्थ व वासरी येथील अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या काही बोटी उडवल्या. खऱ्या परंतु या घाटांवर रात्रीतून शेकडो ब्रास वाळू उपसा करणाऱ्या फायबर व इतर अनेक बोटी लपवल्याने कारवाई अर्धवटच राहिल्याचे बोलले जात आहे.
मुदखेड तालुका हरित पट्टा घोषित असल्याने वाळू उपशाला बंदी आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून शंखतीर्थ, वासरी घाटातून अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा सुरूच आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या आदेशाने मुदखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाने ता. ६ गुरुवार रोजी शंखतीर्थ व वासरी येथील घाटावरील काही बोटी जिलेटीनद्वारे उडवून दिल्या. परंतु काही राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू माफियांनी फायबर बोटी आजूबाजूच्या परिसरात पळविल्या तर काही मोठ्या बोटी गोदावरीच्या पाण्यात बुडविल्या.
त्याच्या चित्रफीत आणि छायाचित्रे आता ग्रामस्थांनी समोर आणली आहेत. त्यामुळे त्या बोटींवर कारवाई झालेली नसून आता पुन्हा त्या बोटीतून रात्रभर अवैध रित्या वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अवैध वाळूच्या जलद व गतिमान वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थी, अवाल वृद्धांची रस्त्यावरील सुरक्षितताही धोक्यात आली आहे.
महसूल प्रशासनाने केलेली कारवाई अपूर्ण राहिलेली असून मुदखेडच्या हरित पट्ट्यातील गोदावरीच्या घाटात अवैध वाळूचा उपसा सुरूच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी कधी होणार ? आणि शंखतीर्थ, वासरी येथील वाळू माफियांचे गोदावरी खोऱ्यातील कायमस्वरूपी उच्चाटन कधी होणार ? हेच आता पाहावे लागेल.