

Loha city stray dogs
लोहा : लोहा शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, वृद्ध, महिलामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही कुत्र्यांना खरुज सारखा आजार झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे बंदोबस्त नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची लगबग सुरू असून शहरातील विविध भागातील शाळेमध्ये विद्यार्थी जाताना मोकाट कुत्र्यांचा त्रास होऊ लागला आहे. मोकाट कुत्र्यांचा शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच महिला वर्ग वृद्ध व आजारी लोकांमध्ये दहशत पसरली आहे. याकडे नगर परिषदेचे लक्ष नाही.
सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे मॉर्निंग वॉक कडे लोकांचा कल वाढला आहे. पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी शहरातील अनेक लोक शहराच्या विविध भागांमध्ये पहाटे घराबाहेर पडत आहेत. पण त्यांना शहरातील रस्त्यावरच ठाण मांडून बसलेल्या मोकाट कुत्र्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील अनेक लोकांनी तत्काळ नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.