

नायगाव (नांदेड) : "तक्रार मागे घे नाहीतर संपवतो" अशी धमकी देत थरकाप उडवणारा प्रकार नायगाव शहरात उघडकीस आला आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ती सोनाली उर्फ मंगल प्रकाश हंबर्डे (वय ३७, रा. विठ्ठलनगर, नायगाव) यांच्यावर ही धमकी देण्यात आली असून, या प्रकरणी नायगाव पोलिसांनी माधव दत्ता गिरगावे (रा. नायगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोनाली हंबर्डे या समाजहितासाठी सतत झटणाऱ्या कार्यकर्त्या असून, त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी नायगाव येथील बाँड विक्री करणाऱ्या दोन परवानाधारकांविरुद्ध अनियमिततेची तक्रार जिल्हा निबंधक (वर्ग१) नांदेड तसेच सहायक दुय्यम निबंधक, नायगाव यांच्याकडे दाखल केली होती. या तक्रारीचा राग मनात ठेवून आरोपी गिरगावे याने ४ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास हेडगेवार चौकात हंबर्डे यांच्या जवळ येऊन संतापाने वाद घातला. "तु गजानन चौधरी व पांडुरंग जाधव यांच्या विरोधात तक्रार का दिलीस? तुझ्यामुळे माझा धंदा बंद झाला!" असे म्हणत त्याने अश्लील शिवीगाळ केली आणि पुढे "तु रांड आहेस, तुला जीवनातून उठवतो. तु तक्रार मागे घेतली नाहीस तर तुला जिवंत ठेवणार नाही!" अशी धमकी दिली. यावेळी उपस्थित असलेले माधव श्रीराम आनेराये व नागोराव बंडे यांनी दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोनाली हंबर्डे यांनी नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दिली. नायगाव पोलिसांनी भा.दं.वि. कलम ५०४, ५०६, ५१० अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाचे काम पोलीस शिपाई साईनाथ नागोराव सांगवीकर यांच्याकडे सोपविले आहे.
या घटनेनंतर नायगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून, "सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी!" अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.