

Illegal sand excavation from Godavari riverbed
विशेष प्रतिनिधी
नांदेड : जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून गोदावरी नदीच्या बंदाघाटावर सोमवारी सकाळी संगीतप्रेमींची 'दिवाळी पहाट' सुरू झाली. या कार्यक्रमादरम्यान लेखिका डॉ. मीरा कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या 'गोदावरी'च्या हृद्य मनोगतातून या नदीच्या रक्षणाचा, तिचे नैसर्गिक अस्तित्व जपण्याचा संदेश दिला जात असताना तेथून काही अंतरावरच मुदखेड तालुक्याच्या हरीत पट्ट्यातच माफियांकडून नदीपात्रातील वाळू उपसा सुरू होता.
प्रशासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून दीपावलीदरम्यान तीन किंवा चार दिवसांचा 'दिवाळी पहाट' कार्यक्रम साजरा केला जातो. सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रात ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल यांचा कार्यक्रम नियोजित असल्यामुळे बंदाघाटावर संगीतप्रेमींची मोठी मांदियाळी जमली होती.
हा कार्यक्रम गोदा वरी नदीकाठी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. मीरा कुलकर्णी यांनी गोदावरीचे मनोगत शब्दबद्ध केले. त्याची ध्वनीफित उपस्थितांना ऐकविण्यात आली. या अनोख्या प्रयोगास उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. या नदीची आख्यायिका सांगतानाच डॉ. मीरा कुलकर्णी यांनी समाजासाठी काही प्रश्न उपस्थित केले. नदी प्रदूषित करणे, काठावरची झाडे तोडणे, वाळू ओढून नेणे यावरही त्यांनी बोट ठेवले.
गोदावरी नदीचे मनोगत नांदेडमध्ये संगीतप्रेमींना ऐकविले जात असताना शेजारच्या मुदखेड तालुक्यातील टाकळी, शंखतीर्थ, वासरी या हरित पट्ट्यात नदीपात्रामध्ये फायबर बोटी दाखल झाल्या होत्या. भल्या पहाटेच तेथे वाळू उपसा सुरू असल्याचे बघायला मिळाल्यानंतर काँग्रेसचे संदीपकुमार देशमुख यांनी वरील बाब समाजमाध्यमांतून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
गोदावरी नदीकाठावरील परस्परविरोधी चित्र त्यांनी छायाचित्रांसह प्रसूत केले. महसूलमंत्री बावनकुळे यांनी बेकायदेशीर वाळू उपशाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यातच दिले होते; पण प्रशासन संगीताच्या दुनियेत रमलेले असताना वाळू माफियांनी बेसुमार उपसा सुरू ठेवला होता.