

Distribution of sarees to flood-affected women
किनवट, पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या राष्ट्र सेविका समिती आणि सेवाभारती या संस्थांनी सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत दिवाळीनिमित्त हृदयस्पर्शी उपक्रम हाती घेतला. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नालगड्डा व बेल्लोरी नदीकाठावरील भागातील अनेक महिलांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले होते. त्या महिलांना सणासुदीच्या काळात आनंदाचा क्षण मिळावा, या उद्देशाने साड्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात डॉ. अनुराधा उपासनी, वंदना तिरमनवार, नंदा तिरमनवार, अंजली राठोड, संगमेश्वरी चव्हाण व वृषाली वैद्य यांनी सहभाग घेतला. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या माहूर येथील जयश्री विजय आमले यांनी या कार्यात मोलाचे सहकार्य केले.
राष्ट्र सेविका समिती ही महिलांसाठी कार्य करणारी संघ प्रेरित संस्था असून स्त्रीशक्ती, संस्कार व राष्ट्रभावना जागविणे हा तिचा प्रमुख हेतू आहे; तर सेवाभारती ही शिक्षण, आरोग्य, आपत्ती निवारण व ग्रामविकास या क्षेत्रांत काम करणारी संघ परिवारातील सामाजिक सेवा संस्था आहे. या दोन्ही संस्थांनी पूरबाधित परिसरात दिलासा देऊन "सेवा परमो धर्मः" या तत्त्वाचा प्रत्यय घडविला.