

One lakh pension for farmers
नरेंद्र येरावार
उमरी पुढारी वृत्तसेवा : दान देणारे हात हे देवासारखे असतात. कारण तेच दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसतात आणि शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याच्या संकट समयी हातभार लावणे हे माझे कर्तव्य आहे. ज्यांच्या हातात करुणा असते. त्यांना देव शोधण्याची गरज नसते हा उदात्त घेतू डोळ्यासमोर ठेवून उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील सेवानिवृत्त अभियंता उत्तमराव गणपतराव देशपांडे आपल्या निवृत्ती वेतनातून जमवलेल्या तब्बल एक लाख रुपयाचा धनादेश ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाठवला आहे. तो धनादेश आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला.
एक सेवानिवृत्त अभियंता आपल्या सेवानिवृत्तीतून जमवलेल्या रकमेतून तब्बल एक लाख रुपयांचा धनादेश शेतकऱ्यांसाठी देतो. ही एक कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. धनादेश स्वीकारताना आमदार चिखलीकर यांच्यासोबत माजी आमदार मोहन हंबर्डे, शिरीष देशमुख गोरठेकर, सुधाकरराव देशमुख धानोरकर, सुभाषराव गोरठेकर, रावसाहेब पाटील बोरजुत्रीकर उपस्थित होते. ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काळोख पसरला असताना सेवानिवृत्त देशपांडे यांचे योगदान म्हणजे एक आदर्श ठरला आहे. उत्तमराव गणपतराव देशपांडे यांनी केलेल्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.