

जाफराबाद : तालुक्यातील डावरगाव देवी येथील जगदंबा माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तीर्थक्षेत्रात महाराष्ट्राच्या विविध भागांतून शेकडो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. मंदिर परिसरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, मंदिरातील भव्य दीपमाळही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला. उत्सवानिमित्त काकडा आरती, भजन, विष्णुसहस्रनाम, भागवत कथा, हरिपाठ, दांडिया, महाआरती, हरिकीर्तन आणि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून, जगदंबा मातेच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी होत आहे.
अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत दररोज रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये मनीषाताई शिंदे, भगवान बाबा शिंदे, बाबुराव महाराज काळे, स्वामी हौसानंदपुरी महाराज, तेजस्विनीताई नवले, गंगाराम महाराज राऊत, प्रकाश महाराज जंजाळ आणि सोनाली दीदी महाजन यांच्यासह अन्य कीर्तनकार सेवा देत आहेत.
डावरगाव देवी येथे लोकसहभागातून जगदंबा मातेच्या भव्य मंदिराची उभारणी सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या बांधकामाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत मंदिराच्या बांधकामावर अंदाजे तीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.भव्य मंदिराच्या उभारणीमुळे या तीर्थक्षेत्राच्या धार्मिक वैभवात भर पडणार असून, भाविकांसाठी हे मंदिर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
पूर्णा नदीवर पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली
डावरगाव देवी येथील जगदंबा माता मंदिर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्यामुळे नदीच्या पलीकडील भागातून येणाऱ्या भाविकांना मंदिरात पोहोचण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात नदीमुळे मार्ग बंद राहत असल्याने चार ते सहा महिने भाविकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पूर्णा नदीवर लवकरात लवकर पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.