

Gunfire and sword attack in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
नांदेड शहरातील नगिनाघाट परिसरात शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. या हाणामारीत एकाने थेट पिस्तुलातून गोळीबार केला, तर दुसऱ्याने तलवारीने हल्ला चढवला. या घटनेत दोनजण गंभीर जखमी झाले असून, या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
कमलप्रीतसिंघ अमरजितसिंघ सिद्धू (वय ३३, रा. अबचलनगर, नांदेड) आणि परमिंदरसिंघ राजेंद्रसिंघ चावला (वय २६) अशी जखमींची नावे आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा दर्शनासाठी परराज्यातून आलेले काही यात्रेकरू आणि स्थानिक नागरिक यांच्यात नगिनाघाट परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाला. शब्दाने शब्द वाढल्याने वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी रागाच्या भरात भाविकांच्या गटातील एकाने आपल्या जवळील बंदुकीतून गोळीबार केला, तर दुसऱ्या एकाने तलवारीने हल्ला चढवला.
या हल्ल्यात कमलप्रीतसिंघ सिद्धू याच्या डाव्या मांडीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला, तर परमिंदरसिंघ चावला याच्या डोक्याला तलवार लागल्याने दुखापत झाली आहे. या दोघांवरही तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध
भरवस्तीत गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणली. हल्ला करणारे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते, मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.