

Nanded BJP State-level leader Madhav Bhandari
विशेष प्रतिनिधी
नांदेड : भाजपा नेते, खासदार अशोक चव्हाण यांनी स्थानिक पातळीवरील आपल्या राजकीय विरोधकाची खिल्ली उडवल्याची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांत फिरत असताना भाजपाचे राज्यस्तरीय नेते माधव भांडारी यांनी मात्र चव्हाण यांच्या याच विरोधकाच्या घरी जाऊन स्वागत-सत्कार स्वीकारल्याचे दृश्य समोर आले आहे.
यांतील चव्हाणविरोधी नेता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाकेबाज आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे होत. मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आ. चिखलीकर करत असून त्यांनी पक्षातर्फे वेगवेगळ्या प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. वृत्तवाहिन्यांच्या स्थानिक प्रतिनिधींनी खा. चव्हाण यांना चिखलीकर आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या आव्हानाबद्दल गुरुवारी एक प्रश्न विचारला तेव्हा 'कोण प्रताप पाटील, मला माहिती नाही कोण आहेत, कोणाची गोष्ट करताय' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. भाजपा जाहीरनाम्याच्या प्रकाशन समारंभात चिखलीकर व अन्य कोणत्याही विरोधकाचे नाव न घेता चव्हाण यांनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतला होता.
खा. चव्हाण यांच्या वरील प्रतिप्रश्नावर आ. चिखलीकर यांचे उत्तर अद्याप आलेले नाही. पण भाजपा जाहीरनाम्याच्या प्रकाशनानिमित्त येथे आलेल्या माधव भांडारी यांनी गुरुवारी विविध ठिकाणी भेटी दिल्याचेही दिसून आले. नरहर कुरुंदकर स्मारकाला भेट देऊन या स्मारकातील उपक्रमांची माहिती घेतली.
त्याची कोठेही चर्चा झाली नाही; पण गुरुवारी रात्री त्यांनी आ. चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्याचे छायाचित्र समोर आले आहे. या भेटीत चिखलीकर यांच्या भाजपामध्ये असलेल्या कन्या प्रणिता वरे-चिखलीकर यांनी भांडारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंतर भांडारी यांनी चिखलीकर व प्रणिता देवरे यांच्यासमवेत बराचवेळ चर्चा केल्याचे सांगण्यात आले.