

'Giving wings to fly' initiative for young women from economically weaker sections to become pilots!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या पुढाकाराने व भारत केयर्स यांच्या सहकार्याने 'गिविंग विंग्स टू फ्लाई' या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुण महिलांना व्यावसायिक वैमानिक बनण्यासाठी मार्गदर्शन करणारी आभासी बैठक १ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या निर्देशन व मार्गदर्शनात घेण्यात आली.
या बैठकीत भारत केयर्सचे संसाधन व्याख्याते कालपेश मोहोड यांनी वैमानिक क्षेत्रातील संधी, प्रशिक्षण प्रक्रिया, आवश्यक पात्रता, करिअरच्या विविध संधी तसेच व्यावसायिक वैमानिक होण्यासाठी आवश्यक असलेल्या टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थिनींना या क्षेत्राकडे आत्मविश्वासाने पाहण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामध्ये १८ ते ३५ वयोगटातील भारतीय महिलांसाठी व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रशिक्षणामध्ये कमर्शियल पायलट लायसन्स टाईप रेटिंग प्रशिक्षण, निवड प्रक्रियेसाठी प्रवास व निवास खर्च, वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
या आभासी बैठकीस विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, स्वयंसिद्ध स्त्री शक्ती उपक्रमाचे समन्वयक डॉ. नीना गोगटे, स्त्री अध्ययन केंद्राच्या केंद्र प्रमुख डॉ. शालिनी कदम, भारत केयर्सचे भगवान बिदाराकोटे, मानसी दीवान तसेच दत्ता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सर्व महाविद्यालयाना परिपत्रक पाठविले आहेत त्यानुसार विद्यार्थिनींनी दि.७जुलाई पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा व या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यानी केले. प्रास्ताविक व समन्वय विद्यार्थी विकास विभागामार्फत करण्यात आले. आभार डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी केले.