

Kinwat Forest Conservation
किनवट: सागवान तस्करी, अवैध वृक्षतोड व वन्यजीवांची अनधिकृत तस्करी यावर अंकुश ठेवण्यासाठी वनविभाग आता अधिक सक्रीय झाला आहे. नागरिकांमध्ये वनसंवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, वनकर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे आणि तस्करांच्या मनात धडकी भरावी, या उद्देशाने शनिवारी (दि.21) किनवट शहरात वनविभागाच्यावतीने पथसंचलन करण्यात आले.
उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक जी.डी. गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड (किनवट) आणि धीरज मदने (खरबी) यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन पार पडले. यामध्ये सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांच्यासह दोन्ही परिक्षेत्र कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
गंगानगर, सुभाषनगर, हमाल कॉलनीसारख्या संवेदनशील भागांतून तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून या पथसंचलनाची प्रभावी मिरवणूक काढण्यात आली. वनविभागाचा गणवेषधारी ताफा आणि शिस्तबद्ध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
हे पथसंचलन म्हणजे केवळ शिस्तीचे दर्शन नव्हे तर अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना दिलेला स्पष्ट इशाराही होता की, वनसंवर्धनाच्या लढ्यात वनविभाग मागे हटणार नाही. वन्यजीव संपत्ती आणि निसर्गसंपदा जपण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला. पथसंचलनामुळे नागरिकांमध्ये कुतूहलासह सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या.