

Open sale of drugs in Nanded city
विशेष प्रतिनिधी
नांदेड : खासगी शिकवणी वर्ग आणि वैद्यकीय अभियांत्रिकी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासासाठी नांदेड मध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी व्यसनाधीन होत असून शहराच्या मध्यवर्ती भागातील दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. ती थांबविण्याची तसेच अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनामध्ये समितीची बैठक घेण्यात आली. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. अजित गोपछडे, खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश आमदार बैठकीस हजर होते. या बैठकीत नांदेड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी विविध विभागांचे लक्ष वेधले.
नांदेडमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरच्या जिल्ह्यातील तसेच अन्य प्रांतांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने वास्तव्यास असून त्यांच्यातील अनेकजणं तंबाखू व धूम्रपान या पारंपरिक व्यसनांच्या पुढच्या पायरीवर गेले असल्याची चर्चा वेगवेगळ्या माध्यमांतून होत आहे. शहराच्या उत्तर भागातील निवासी वस्त्यांमध्येच वेगवेगळे क्लासेस आणि तयारी वर्ग फोफावले असून त्यामुळे अनेक वसाहतींमध्ये गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात असतानाच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अमली पदार्थांच्या विक्रीचा आणि त्यावर संबंधित यंत्रणांचे नियंत्रण नसल्याचे मुद्दे निघाल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांनी अमली पदार्थ विक्रीविरुद्ध तत्काळ कारवाया करण्याची सूचना संबंधित विभागांना दिली.
मागील काही आठवड्यांपासून नांदेड शहर आणि जिल्ह्यातील महावितरणच्या कारभाराविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत आहेत. विद्युत पुरवठ्यातील विस्कळीतपणा ही बाब नित्याचीच झाली असून संबंधित विभागातच 'दिव्याखाली अंधार' अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबद्दल बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. लोहा कंधार भागाच्या आमदाराच्या गावातच अनेक दिवस विद्युत पुरवठा खंडित होता. या सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये स्वतंत्र बैठक घेण्याचे जाहीर केले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भाजपाचे राज्यसभा सदस्य गुरुवारी सायंकाळीच शहरामध्ये दाखल झाले. शुक्रवारी सकाळी त्यांनी पालकमंत्र्यांची भेटही घेतली. बैठकीमध्ये ते खा. अशोक चव्हाण यांच्या शेजारीच स्थानापन्न झाले होते. बैठकीतील चर्चेदरम्यान जिल्ह्यातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांचे केवळ भोकर मतदारसंघाकडे जास्त लक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावला.