

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड-वाघाळा शहर मनपा निवडणुकीच्या धामधूमीत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये केवळ तोंडी सूचनेवरून काही उमेदवारांना रुजू करून घेण्यात आले आहे. या संदर्भात काँग्रेसचे संदीप देशमुख बारडकर यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी होण्यापूर्वीच पंचवीसहून अधिक उमेदवार रुजू झाल्याचे समोर आले आहे.
गेल्यावर्षीच्या उत्तरार्धात, जिल्हा बँकेतील सरळसेवा नोकरभरतीचा विषय स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत वादग्रस्त झाल्यानंतर शासनाच्या सहकार विभागाने प्रस्तावित नोकरभरतीस ऑक्टोबरमध्ये स्थगिती दिली. ती अद्याप कायम आहे. बँकेच्या बिंदूनामावली नोंदवही (रोस्टर) मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.
बँकेतील भरती थांबली असल्याच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या एका बैठकीत बँकेमध्ये करार पद्धतीने एकत्रित पगारावर काम करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पगार वाढीसंदर्भात केलेल्या अर्जांवर निर्णय घेण्याचा विषय ठेवण्यात आला होता. ज्या 45 कर्मचाऱ्यांचे काम चांगले आहे त्यांना जानेवारी 2026 पासून दरमहा एक हजार रुपये वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुख्यालयात काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांनाही अशीच वाढ करण्यात आली.
वरील निर्णय घेताना काही संचालकांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेमध्ये चांगले काम केलेल्या 45 प्रशिक्षणार्थींना प्रतिमहा 10 हजार रुपये पगारावर नियुक्त करण्याची बाब याच ठरावामध्ये अंतर्भूत केली. या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने नियुक्त करता येणार नाही, असे मत बँकेच्या प्रशासनाने सभेमध्ये मांडले हेोते. या अर्धवट ठरावाचा आधार घेत वरील योजनेत बँकेत काम केलेल्या प्रशिक्षणार्थींना पुन्हा भरती करण्यात आले आहे.
बँक संचालक मंडळाच्या डिसेंबरअखेर झालेल्या बैठकीपूर्वी काही संचालकांनी वरील भरतीसंदर्भात बराच खल केला. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत बँकेच्या महाव्यवस्थापकांनी प्रशासकीय बाजू सांभाळली. नोव्हेंबरमधील ठरावानुसार 45 जणांची भरती झाली पाहिजे यासाठी बँकेचे उपाध्यक्ष व काही संचालक आग्रही होते. या उमेदवारांना कामावर रुजू होण्यासाठी लेखी आदेश जारी करण्यास महाव्यवस्थापकांनी नकार दिला; पण त्यांच्याच तोंडी आदेशावरून वेगवेगळ्या शाखांमध्ये उमेदवार रुजू झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार खा.अशोक चव्हाण यांचा बँकेतील बेकायदेशीर नोकरभरतीस स्पष्ट विरोध आहे. पण त्यांचेच समर्थक गोविंदराव शिंदे नागेलीकर हे वरील ठरावाचे सूचक होते. आता नागेलीकर यांच्यासह सविता रामचंद्र मुसळे यांच्या शिफारशीतील प्रत्येकी दोन उमेदवार रुजू झाले आहेत. खा.रवींद्र चव्हाण, एच.व्ही.बेटमोगरेकर, प्रवीण चिखलीकर, मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहीफळे, बाळासाहेब रावणगावकर, बाबूराव कोंढेकर, राजेश पावडे व इतर काही संचालकांचेही उमेदवार रुजू झाले असल्याची माहिती मिळाली.