किनवट : करणीच्या संशयावरून एका शेतकऱ्यावर लोखंडी फास व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना माळकोल्हारी (ता. किनवट) येथे घडली असून याप्रकरणी किनवट पोलिसांत बुधवारी (दि.११) चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागनाथ टारपे असे मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नागनाथ टारपे हे अंगणात बसले असताना त्यांच्या घरासमोर राहणारे दोघेजण तेथे आले व त्यांनी 'तु आमच्यावर करणी केली आहेस' असे म्हणत नागनाथ टारपे यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. लोखंडी वखराच्या फासाने व लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत नागनाथ हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पत्नी रेणुका टारपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारोती मोतीराम टारपे, राजू मारोती टारपे, अनिता मारोती टारपे, कलाबाई मारोती टारपे (सर्व रा. माळकोल्हारी) या चौघांविरुद्धात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.