

Emphasize transparent governance: MP Chavan
भोकर, पुढारी वृत्तसेवा : भोकर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासाला पात्र राहून पारदर्शक कारभार करावा. प्रशासनानेही नागरिकांची कामे प्रलंबित न ठेवता ती तातडीने मार्गी लावावीत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे केले.
भोकर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ शुक्रवारी पालिका कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी आ. श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमिताताई चव्हाण, प्रकाशराव देशमुख, तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी, सभापती जगदीश भोसीकर, विशाल माने, शेख युसूफ आणि मुख्याधिकारी ऋषभ पवार. यावेळी खासदार चव्हाण पुढे म्हणाले की, माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून भोकर शहराच्या जडणघडणीकडे मी विशेष लक्ष दिले आहे.
आगामी काळात शहराचा नावलौकिक राज्यात होईल, असा विकासाचा नवा अजेंडा आम्ही तयार केला आहे. प्रदीर्घ काळानंतर पालिकेला लोकनियुक्त पदाधिकारी मिळाले असून, आता खऱ्या अर्थान लोकशाही व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. नागरिकांची कामे कोणत्याही कारणास्तव प्रलंबित ठेवू नका.
कारभारात पूर्णपणे पारदर्शकता ठेवा. सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण तातडीने करा, असेही खा. अशोकराव चव्हाण म्हणाले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व सर्व नगरसेवकांचा खासदार चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मनोज गिमेकर यांनी केले.