

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानावर छापा टाकून तब्बल 703 अवैध शस्त्रांचा साठा जप्त केला आहे.
यामध्ये 470 तलवारी, 209 खंजर व चाकू आणि 24 फायटर,पंच अशा घातक शस्त्रांचा समावेश असून, एकूण 14 लाख 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 15 दिवसांपूर्वीच नांदेड ग्रामीण पोलिसांनी साडेपाच हजार तलवारी आणि गुप्तींचा साठा पकडला होता. ही घटना ताजी असतानाच पोलिसांनी केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व त्यांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना दिले होते. या अनुषंगाने दि. 22 मे रोजी गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, देना बँक ते सचखंड गुरुद्वारा रोडवरील 300 सालाना शॉपिंग प्लाझामधील दुकान क्रमांक 8 मध्ये रणजितसिंग रामसिंग सरदार (रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) हा विनापरवाना व बेकायदेशीरर्यीा तलवारी आणि घातक शस्त्रे विक्रीसाठी आणून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने सदर दुकानावर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच दुकान मालक रणजितसिंग सरदार हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, पोलिसांनी दुकानाचा कोनाकोपरा तपासला असता, तिथे शस्त्रांचा मोठा साठा आढळून आला.
सर्व मुद्देमाल वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 238/2026 अन्वये भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 आणि 7/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
नांदेड शहरात मोठ्याप्रमाणात पिस्टल, तलवारी, खंजर, गुप्ती अशा घातक शस्त्रांचा अवैधरित्या खरेदी विक्रीचे अनेक टोळ्यासक्रीय आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी, गँगवार, हत्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यॉक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. त्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी कोंम्बींग ऑपरेशन, ऑपरेशन क्रॅकडाऊन, आमलीपदार्थ विरोधात,गुटखा विरोधी मोहिम राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहिम उघडली होती. त्या अनुषंगाने 15 दोन दिवसांत मोठ्या कारवाया करत पोलिसांनी अवैधरित्या शस्त्र विक्री करणा-यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
दोन आठवड्यांत दुसरी मोठी कारवाई!
नांदेडमध्ये काही दिवसांपासून अवैध शस्त्रांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे चित्र आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वीच नांदेड ग्रामीण पोलिसांनी साडेपाच हजार तलवार, खंजर आणि गुप्ती असा देशातील सर्वांत मोठ्या साठ्यांपैकी एक साठा जप्त केला होता. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा 703 शस्त्रे जप्त केल्याने शस्त्र माफियांचे धाबे दणाणले आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
470 तलवारी: किंमत 12,31,000 रुपये, 209 खंजर व चाकू : किंमत 1,70,900 रुपये, 24 फायटर/पंच: किंमत 2,400 रुपये, एकूण शस्त्रे: 703 (एकूण किंमत: 14,04,300 रुपये)
यांच्या पथकाने केली कारवाई!
सदरची धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड), अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व उपविभागीय पोलिस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, पोलिस अंमलदार रविशंकर बामणे, उमर शेख, मिलिंद नरबाग, ज्ञानोबा कवठेकर, चंद्रकांत स्वामी, अझरोद्दीन शेख, अनिल बिरादार, राजवंतसिंग बंगई, धम्मानंद जाधव, शीतल सोळंके आणि मारोती मुंडे यांच्या पथकाने केली.