ओडिशाहून चंद्रपुरात गांजा तस्करी; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

११ किलो गांजा, ऑटो व मोबाईलसह २.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन महिला व दोन पुरुष आरोपी अटकेत
ओडिशाहून चंद्रपुरात गांजा तस्करी; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Published on
Updated on

चंद्रपूर : जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. ओडिशातून गांजा आणून चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन महिला व दोन पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ११ किलो गांजा, एक ऑटो आणि मोबाईल संच असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, काही महिला ओडिशा राज्यातून गांजा घेऊन बल्लारपूरमार्गे राजुरा येथे विक्रीसाठी जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारपूर-राजुरा सास्ती मार्गावर सापळा रचला. संशयित ऑटो क्रमांक MH-34 BH-1626 थांबवून झडती घेतली असता महिलांच्या पिशव्यांमध्ये ११ किलो अवैध गांजा आढळून आला.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी गांज्यासह ऑटो आणि चार मोबाईल संच असा एकूण २.२२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत मोहम्मद युनुस अली उर्फ बादशाह (३८, ऑटो चालक, बल्लारपूर), लालचंद गणेश केसकर (६५, बल्लारपूर), उमा हामु नुनावत (५०, मुळगु, तेलंगणा), ललिता आकाश दामले (२४, ईटारसी, मध्यप्रदेश) आणि आरती गुलाब परते (२८, भोपाळ, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच ओडिशातील मुनीगडा येथील मुख्य पुरवठादार इंद्रजित पाराससेठ आणि रामबाबू हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कात कडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे  यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news