

लातूर : डुप्लिकेट सोन्याच्या बिस्किटे व दागिन्यांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे 9 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अभिमान राजेंद्र कांबळे (वय 25, रा. तुपडी, ता. निलंगा), धनंजय बालाजी गायकवाड (वय 28, रा. दगडवाडी, लातूर), बालाजी प्रशांत कांबळे (वय 22, रा. तुपडी), बालाजी विठ्ठल गायकवाड (वय 54, रा. भातखेडा, लातूर) आणि सचिन बालाजी गायकवाड (वय 28, रा. मेघराज नगर, लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही टोळी मागील काही काळापासून डुप्लिकेट सोन्याची बिस्किटे, अंगठ्या व दागिने तयार करून ते खरे सोने असल्याचा आभास निर्माण करत नागरिकांची फसवणूक करीत होती. विशेषतः महिला, वृद्ध नागरिक व एकटे प्रवास करणारे नागरिक यांना लक्ष्य केले जात होते. पोलिस अधीक्षक अमोल तांबेयांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
13 जानेवारीरोजी गरुड चौक ते राजीव गांधी चौक रिंग रोडवरील सिकंदरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित आरोपी फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता सापळा रचूनॉ पथकाने त्यांना ताब्यात घेतले. झडती दरम्यान 42 ग्रॅम खरे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, 16 डुप्लिकेट सोन्याची बिस्किटे, 3 डुप्लिकेट अंगठ्या, टाटा इंडिगो कार व होंडा ॲक्टिव्हा स्कूटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपींचा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर ग्रामीण व चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांशी संबंध आढळून आला आहे. तसेच धाराशिव, नांदेड व परभणी जिल्ह्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. तपासात या टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दगडू जाधव (वय 27, रा. जठाळ कॉलनी, लातूर) असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू असून लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी अटक आरोपींना उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.