

नांदेड : काँग्रेसच्या उमेदवाराचे पती शिवाजी गणपत भालेराव यांच्यावर मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास तलवारीने हल्ला झाला. या प्रकरणात भाग्यनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत अवघ्या बारा तासांत आरोपींना जेरबंद केले.दरम्यान, उमेदवाराच्याचे पती भालेराव यांनी केलेली तक्रार आणि आरोपींनी दिलेल्या कबुलीमध्ये तफावत आढळल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेसचे उमेदवाराचे पती शिवाजी भालेराव हे तरोडा नाका भागातील बेलानगर हे ज्ञानेश्वर नगर येथे मित्राच्या घरासमोर गप्पा मारत बसले असता तीन दुचाकींवर आलेल्या सात जणांनी आपल्यावर तलवारीने हल्ला करत तू प्रचार कसा करतोस, तुझा बियाणी करतो अशी धमकी दिली जवळची बॅग पळविली.
ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी भालेराव यांची भेट घेऊन पोलिसांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणात भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांचे पथक उपलब्ध सीसीटीव्ही व माहितीगाराकडून तपासचक्रे फिरवले. अवघ्या 12 तासांत रितेश दीपक पंडित (वय 22),शुभम संजय नरवाडे (वय 19) संघर्ष महेंद्र मगर (वय 19), चांदेश ऊर्फ ओमकार कोंडीबा जाधव (वय 18),वैभव गोपाळ थोरात व दोन अल्पवयीन अशा सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता यातील आरोपींनी आम्हाला उमेदवार हे पैसे वाटप करत असल्याचे समजले त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भालेराव यांना खंजरचा धाक दाखवून त्यांच्या जवळील बॅग पळविली अशी कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडील गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी, खंजर व दहा हजार रुपयांची बॅग जप्त केली. दरम्यान, या प्रकरणात हल्ला झालेल्या भालेराव यांनी केलेली तक्रार आणि पकडलेल्या आरोपींनी दिलेली कबुली यात तफावत असल्याने. या प्रकरणाची उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. या प्रकरणात संपूर्ण चौकशीअंती सत्य समोर येेईल.