

बीड : नगरपरिषद निवडणुकीनंतर बीड शहरातील विविध प्रभागांमधील नागरिकांनी मूलभूत नागरी सुविधांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी व मागण्या केल्या आहेत. त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी नगरपरिषदेतील भाजपच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे मंगळवारी (दि.6) निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बीड शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, आवास योजना, पार्किंग, महसूल वाढ, तसेच बिंदुसरा नदी सुशोभिकरण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मागण्या मांडण्यात आल्या. निवेदनात पुढे म्हटले की, प्रामुख्याने नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड नियमित पाणी पुरवठा कसा करता येईल, याबाबत नियोजन करावे. काडीवडगाव व माजलगाव बॅक वॉटर येथे सोलार सिस्टीम बसवून वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, काडीवडगाव-ईट बीड पाईपलाईनवरील गळती तातडीने दुरुस्त करावी. बिंदुसरा धरणावरून धानोरा रोड मार्गे नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सर्व प्रभागांमध्ये घंटागाड्या नियमित व नियोजनबद्धपणे फिरतात की नाही, यावर नियंत्रण ठेवावे. घंटागाड्यांवर जीपीएस ट्रॅकर बसवून त्या सध्या कोणत्या भागात आहेत, याची माहिती नागरिकांना मिळेल, अशी व्यवस्था करावी. तसेच नवीन घंटागाड्या, कॉम्पॅक्टर व जेसीबी खरेदी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शहरातील छोट्या चौकाचौकात मिनी हायमास्ट बसवावेत. नवीन पथदिवे बसवून बंद किंवा नादुरुस्त असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत. नगर परिषद कार्यालयावर सोलार सिस्टीम बसवावी आणि मोठ्या चौकांतील हायमास्ट दिवे नियमितपणे सुरू ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील सर्व मालमत्तांची नोंद नगर परिषदेच्या रेकॉर्डमध्ये घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून नगर परिषदेच्या महसुलात वाढ होईल. तसेच, पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेचे नवीन प्रस्ताव मंजूर करावेत. तसेच ज्यांना घरे मंजूर झाली आहेत, त्यांचे पुढील हप्ते तातडीने वितरित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. बीड शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सुविधा निर्माण करावी. दर चतुर्थीला वेळेवर सायरन वाजवण्यात यावा.
तसेच, बिंदुसरा नदी सुशोभिकरणाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशीही मागणी केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित या सर्व नागरी सुविधा तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी निवेदनात केली आहे. या मागण्यांकडे नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
मुख्याधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
भाजपच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्या पूर्ण करण्यात येतील. आवश्यक ती कार्यवाही करून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न नगरपरिषद प्रशासनाचा राहील, असा सकारात्मक प्रतिसाद मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या मांडल्या.