

पेठपिंपळगाव : मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला. ग्रामीण भागात सणाची तयारी जोमात सुरू झाली. संक्रांतीच्या गोडव्यात भर घालणाऱ्या पारंपरिक मातीच्या वाणांसाठी कुंभार समाजातील कारागीर सध्या मेहनत घेताना दिसत आहेत. फिरत्या चाकावर देसी मातीला आकार देत सुगडे, मातीची भांडी व इतर वाण तयार करण्यासाठी कुंभारांचे हात अहोरात्र झिजताना पहावयास मिळत आहेत.
ग्रामीणमध्ये आजही मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनी एकमेकींना मातीची वाण देण्याची प्राचीन परंपरा आहे. यामुळे प्लास्टिक व आधुनिक साहित्याचा वापर वाढला, मातीच्या वस्तूंना अजूनही विशेष मागणी आहे. कुंभारांच्या हातून साकारलेली मातीची वाण ही पर्यावरणपूरक व परंपरेचे प्रतीक मानली जाते. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीचा सण गृहिणींच्या आनंदाचा म्हणून ओळखला जातो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या संदेशातून समाजातील प्रेम, आपुलकी व सलोखा वृध्दिंगतचा हा सण आहे.
दिवाळीनंतर वर्षातील हा एकमेव सण कुंभार समाजाच्या जीवनात आर्थिक गोडवा आणणारा ठरतो. मात्र बदलत्या काळात कुंभार व्यवसायासमोर अनेक अडचणी आहेत. माती, लाकूड व इंधन मिळवणे दिवसेंदिवस महाग होत असून उत्पादन खर्च वाढत आहे. पूर्वीपेक्षा मातीच्या वाणाची मागणी काही प्रमाणात घटली. नवीन पिढी या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
कुंभार म्हणतात की, पूर्वी हे काम वृध्द व अनुभवी मंडळी मनापासून करत असत. मात्र आज तरुणपिढी शिक्षण व अन्य रोजगार शोधात असल्यामुळे मातीची भांडी व वाण बनवण्यास तयार नाहीत. माती व लाकूड गोळा करण्याचे कष्टाचे काम करण्याकडेही नवयुवकांचा कल कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात ही परंपरा टिकवणे आव्हानात्मक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तिळांच्या दरातही यंदा मोठी वाढ
शासन मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या दरात यंदा मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. शेतीला अपेक्षित पाऊस व वातावरणाची साथ न मिळाल्यामुळे तिळाचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारात येणारा तीळ मर्यादित प्रमाणात उपलब्ध असून त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. सध्या बाजारात तिळाचे दर सरासरी 150 रुपये प्रति किलो इतके असून, काही ठिकाणी यापेक्षाही जास्त दराने विक्री होत असल्याचे दिसत आहे. शहरी व ग्रामीणमध्ये दुकानांत रेडिमेड तिळगुळाचीही मोठी आवक असून ग्राहकांकडून त्याला मागणी आहे.