

धर्माबाद : धर्माबाद तालुक्यातील घरकुल पूर्ण करूनही वाढीव अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही. शासनाकडून ५० हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णयही काढला; मात्र हा निर्णय कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
सध्या बेघर लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी वाळू मोफत, तर १ लाख २० हजारांचे अनुदान चार हप्त्यांत दिले जाते. यात पहिला हप्ता १५ हजार, दुसरा हप्ता ७० हजार, तिसरा हप्ता ३० हजार आणि शेवटचा हप्ता ५ हजार रुपये असा मिळतो. याशिवाय 'मनरेगा'तून बांधकामासाठी २८ हजार रुपयांची मजुरी आणि शौचालयासाठी १२ हजार रुपये मिळतात. मात्र, सध्या 'मनरेगा'चेही पैसे मिळत नसल्याची ओरड लाभार्थींची आहे.
ग्रामविकास विभागाने राज्य सरकारच्या 'पंतप्रधान आवास योजने'तील बेघर लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्याचा शासन निर्णय काढला. त्यातील १५ हजार रुपये सौर ऊर्जेच्या पॅनेलसाठी (सोलर पॅनेल) आणि ३५ हजार रुपये घरकुल बांधकामासाठी राखीव आहेत. मात्र, बेघरांना घरकुल बांधकामासाठी अद्यापही पूर्वीप्रमाणेच एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळत असल्याचे लाभार्थी व अधिकारी सांगतात. शासन निर्णय निघाला, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
सरकारने वाढीव ५० हजारांच्या अनुदानाची रक्कम अद्याप तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. त्यामुळे गोरगरिबांनी घरे कशी उभारावीत, असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे सरकार फक्त मोठमोठ्या घोषणा करून स्वतःचे कौतुक करून घेत आहे, तर दुसरीकडे वाढीव हप्ता रखडल्यामुळे लाभार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.