

Nanded Accident News
धर्माबाद: धर्माबाद ते बाभळी फाटा मार्गावर कार आणि कंटेनरची जोरदार टक्कर होऊन झालेल्या अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:४० वाजताच्या दरम्यान घडली.
श्रीनाथ गंगाधर येवती वाड (वय १८) रा. मंगनाळी, हमु रसिक नगर धर्माबाद असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर धनराज मीनाजी लखमावाड (वय २० रा. रत्नाळी) हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघे कारमधून (एम एच ०१ सिटी ०२२६) प्रवास करीत होते. यावेळी (१६ टी ४२१७) क्रमांकांच्या कंटेनर वाहनाची कारला टक्कर झाली.
या अपघातात कारमधील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने धर्माबाद शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र श्रीनाथ येवतीवाड याचा मृत्यू झाला, तर धनराज लखमावाड याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमीवर डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. पोलिसांनी अपघातातील वाहन आणि चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
उमरखेड शहरात ‘गाडी हळू चालव’ असे सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी रात्री डॉ. झाकीर हुसेन वॉर्डात घडली. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी शेख अतिफ शेख अकबर (वय २०, रा. रहीमनगर, उमरखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश गजानन शिंदे (वय २५, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड) याने त्याच्या ओळखीच्या शेख अतिफ याला गाडी हळू चालविण्यास सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले. त्यानंतर शेख अतिफ याने लोखंडी रॉडने उमेश शिंदे याच्या डोक्यावर, डाव्या डोळ्यावर व गालावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात उमेश शिंदे गंभीर जखमी झाला.