

श्रीपूर : पंढरपूर-पुणे पालखी मार्गावर तोंडले (ता. माळशिरस) येथे बुधवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपमधील तीन ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. अपघातात १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मृतात बबलाद (ता. अक्कलकोट) येथील प्रवीण नामदेव राठोड, रामू गोपू राठोड आणि रेणुका सुरेश पवार यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तर लीला येसू राठोड, सविता बाळू चव्हाण आणि सुरेश बाबू पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकलूजच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात पिकअप चालक आप्पा राठोड, राहुल लालू चव्हाण, पूजा मारुती चव्हाण, मारुती येसू राठोड, सतीश दत्तू राठोड, राकेश एकनाथ राठोड, विशाल सुरेश पवार, रोहित बाळू चव्हाण, रिया परवीन राठोड, प्रेम परवीन राठोड, सुनीता परवीन राठोड, करण होबू पवार आणि रेणुका राजू राठोड हे किरकोळ जखमी झाले. या घटनेचे वृत्त कळताच वेळापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे व चालक राजेंद्र खंडागळे, नितीन भंगाळे, सचिन भोसले, बापुराव पवार यांनी जखमीग्रस्त उपचारासाठी तातडीने हलवले. या अपघाताची या घटनेची वेळापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली.
असा घडला अपघात
बुधवारी (दि. १८) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पिकअपमधून (एमएच ५३ पी १०६२) कर्नाटकातील २२ ऊसतोड मजुरांना घेऊन चालक आप्पा राठोड हा पंढरपूरहून फलटण येथील साखर कारखान्याकडे जात होता. तोंडले गावाजवळील पेट्रोल पंपासमोर शुभमंगल कार्यालयाजवळ कवठाळी येथून श्रीपूरच्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर (एमएच १३ एजी ४६५१) जात होता. याचवेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअपने उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअप उलटला.