

किनवट : धामनदरी (ता. किनवट) येथे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी ६ लाख २० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. डुप्लिकेट चावीचा वापर करून ही चोरी केली असून ओळखीतल्या व्यक्तीनेच ही चोरी केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जगदीश भास्कर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जगदीश भास्कर जाधव हे आपल्या कुटुंबासह बुधवारी (दि.१४) पुतण्याच्या लग्नासाठी किनवट शहराजवळील गोकुंदा येथे गेले होते. लग्नकार्य झाल्यानंतर ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घरी परतले. त्यानंतर कुलुप उघडून घरात प्रवेश केला असता घरामधील दरवाजा उघडा दिसला. व त्याठिकाणी लोखंडी पेटीचे कुलुप तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पेटी उघडून पाहिली असता पेटीतील मंगळसूत्र, अंगठ्या, चेन, बाळांचे ब्रेसलेट, नथ, अशा सोन्या-चांदीच्या दागिनांसह ३५ हजाराची रोकड असा एकूण अंदाजे ६ लाख २० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.