

Illegal teak wood, worth Rs 58,000 seized
किनवट : पुढारी वृत्तसेवा
गोकुंदा ते चिखली (बु) मार्गावर वनविभागाच्या पथकाने गस्तीदरम्यान केलेल्या कारवाईत अवैध सागवान लाकूड वाहतूक करणारी विनानंबर मारुती व्हॅन अडवून, त्यामधील ५ गोल नगांसह एकूण ५८,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच वाहनचालकास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना बुधवार, ३० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता घडली.
किनवट वनविभागाचे पथक गस्त घालत असताना एक विनानंबरची व्हॅन संशयास्पद वाटल्याने पाठलाग करून ती थांबवण्यात आली. पाहणी केली असता त्यात ०.३८२ घनमीटर एवढे अवैध सागवान लाकूड आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ८,०६० रुपये असून, व्हॅनची किंमत ५० हजार रुपये इतकी आहे. चौकशीसह कारवाईसाठी वाहनचालकास ताब्यात घेण्यात आले.
ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी, किनवटचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल. राठोड, तसेच फिरते पथकचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.ए. काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी एम.एन. कत्तुलवार, एस.एम. कोंपलवार, वनरक्षक बालाजी झंपलवाड, रवी दांडेगावकर तसेच वाहनचालक बाळकृष्ण आवले यांनी सहभाग घेऊन लक्षवेधी भूमिका बजावली. वनविभागाच्या या तत्परतेमुळे सागवानाच्या अवैध तस्करीला आळा बसला असून, पुढील तपास वनविभाग करीत आहे.