पुढारी ऑनलाईन डेस्क
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे (Vasant Chavan Death) हैदराबाद येथे उपचार सुरु आसताना सोमवारी पहाटे ३ वाजता निधन झाले. गेल्या दोन आठवड्यापासून ते हैदराबादेत उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.२७ आॕगस्ट) रोजी नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुःख व्यक्त केले आहे.
''काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीतदेखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे.'' असे पटोले यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Congress Nanded MP Vasant Chavan dies due to prolonged illness)
प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला ते डायलिसिस करीत असत. परंतु या महिन्यात पक्षाची नांदेड येथे बैठक असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ॲम्बुलन्समधून त्यांना हैदराबाद येथे दाखल केले होते. परंतु प्रकृतीत सुधार होत असतानाच सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासदार चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभूत केले होते.
नांदेड येथील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांना सद्गती व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो, असे आमदार सतेज पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.