नांदेड : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavan passed away) यांचे हैदराबाद येथे उपचार सुरु आसताना सोमवारी पहाटे तीन वाजता किम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या दोन आठवड्यापासून ते हैदराबादमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला ते डायलिसिस करीत असत. परंतू या महिन्यात पक्षाची नांदेड येथे बैठक आसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांना हैदराबाद येथे उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ॲम्बुलन्समधून त्यांना हैदराबाद येथे दाखल केले होते. परंतू प्रकृतीत सुधार होत असतानाच सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खासदार चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभूत केले होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वसंत चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. नांदेड़ लोकसभा खासदार वसंतराव यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार शरद पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सरपंच ते आमदार आणि नंतर खासदार म्हणून ते निवडून आले. सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या निधनाने तळागाळातून पुढे आलेले नेतृत्व हरपले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार यांनी चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.