

मुखेड : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असा गंभीर अक्षम्य प्रकाराबद्दल (हलगर्जीपणा) शहर काँग्रेस मुखेडच्या वतीने प्रशासनाचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करणे बंधनकारक असताना, मुखेड दुय्यम निबंधक कार्यालयाने याकडे साफ दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे शिवप्रेमी, अहिल्यादेवींचे अनुयायी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात शहर काँग्रेसने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. "प्रशासन पूर्णपणे झोपा काढत असून, अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
या कार्यालयाचा हा पहिलाच प्रताप नाही. यापूर्वी राष्ट्रीय सणाचे गांभीर्य न राखता, भारताचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज अत्यंत उशिरा फडकवण्याचा गंभीर प्रकार याच कार्यालयात घडला होता. एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांचे भान राहिले आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कार्यालयातील वाढत्या अनागोंदी कारभारावर आणि भ्रष्टाचारावर हल्लाबोल करताना काँग्रेसने "आओ चोरो बांधों भारा, आधा तुम्हारा आधा हमारा..." अशी घोषणा देत प्रशासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नसून, केवळ टक्केवारी आणि मलिदा लाटण्यातच प्रशासन व्यस्त असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
राष्ट्रीय पुरुषांचा आणि आदरस्थानांचा अपमान करणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अन्यथा शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.