

Coconut Price increased Know the Reason
नांदेड: नारळ, खोबरे आणि खोबरेल तेलाच्या दरवाढीला गगनही ठेगणे झाले असून ते अवकाशाला भिडले आहेत. २८० रुपये प्रतिकिलो या दराने विकले जाणारे खोबरे सध्या ३५० रुपये प्रमाणे विकले जात आहे. काही दिवसांपूर्वी ते ४०० रुपयांवर गेले होते. तर घाऊक बाजारात १३० रुपये किलोचे खोबरेल तेल ४०० रुपये किलो झाले आहे. नारळाचे दर सुद्धा दुपटीने वाढले आहेत.
श्रावण महिना सुरू असून सणांची मांदियाळी आहे. राखी पौर्णिमा झाली. आता वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे. महाराष्ट्रात हा मोठा सण असून आबालवृद्धांना त्याची ओढ असते. दि. २७रोजी गणरायांचे आगमन होत आहे. त्यामुळे तहेत-हेचे मोदक बनविण्यात मिठाईघर चालक गुंतले आहेत. विशेषतः खोबऱ्यांच्या मोदकाला मोठी मागणी असते. शिवाय या दिवसांत नारळाची मागणी सुद्धा अनेक पटीने वाढलेली असते. गणेशोत्सवानंतर नवरात्र आणि पुढे दिवाळी असे मोठे सण आहेत. या दरम्यान, अनेक छोटे व प्रादेशिक सण सुद्धा येतात.
सणाच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या दरवाढीने लोकांचे मासिक बजेट कोलमडले असताना आता नारळजन्य पदार्थांचे दर सुद्धा प्रचंड वाढले आहेत. 'देवाची करणी आणि नारळात पाणी' अशी एक म्हण प्रसिद्ध आहे; परंतु आता नारळाची करणी आणि गृहिणींच्या डोळ्यांत पाणी असे चित्र आहे.
दुष्काळ आणि किडीमुळे नारळाच्या उत्पादनात घट झाली. याशिवाय केंद्र सरकारने खाद्यतेल आणि क्रूड ऑईलच्या आयात शुल्कात वाढ केल्यानेही तेलाच्या दरात वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी खोबऱ्याचे दर सामान्य होते.
१५० ते १८० रुपये किलो या दराने किरकोळ बाजारात खोबरे विकले जात होते; परंतु नंतर ते २५० ते २८० रुपयांवर पोहोचले. पुढे ४०० रुपयांवर गेले. पण, आता त्यात थोडी घट होऊन ते ३८० रुपयांवर आले आहे. सणासुदीच्या दिवसा नारळ, खोबरे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ याला मोठी मागणी असते. हॉटेलातही चमचमीत पदार्थांसाठी खोबरे कुटून टाकले जाते. एवढेच नव्हे तर अगदी पानपट्टीवर मसाला पानातही खोबऱ्याचा किस वापरला जातो.