

नांदेड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने हर घर तिरंगा या उपक्रमाचे आयोजन केले असून दि. १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी हे तीन दिवस सर्व शाळांमध्ये झेंडावंदन आयोजित करण्यात आले आहे.
राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण शाळा कनिष्ट महाविद्यालये, महाविद्यालये यांना तीन दिवस झेंडा वंदन करण्याचे आदेश दिले आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमातंर्गत दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना सकाळी बोलावण्यात आले असून झेंडावंदन झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापनाने अध्यापनाचे नियोजन करावे असे निर्देशित केले आहे. नागरिकांना आपआपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी आणि तिरंग्याशी वैयक्तिक व भावनिक संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
याबाबत परिपत्रक राज्य शासनाने जारी केले असून सकाळी सव्वानऊ वाजेपर्यंत झेंडावंदन करण्याचे निर्देशित केले आहे. १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे ९ वाजून ५ मिनीटांनी हे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तत्पुर्वी सर्व शाळा महाविद्यालयांनी ध्वजारोहणाचे कार्यक्रम आटोपून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण प्रश्नमंजुशा, देशभक्तीपर गीते, निबंध व कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शासकीय इमारतीवर विद्युत रोषनाई करण्याच्याही सूचना आहेत. यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक त्या सूचना जारी केल्या. नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केले. त्यावर कोणत्या वेळेत शाळा भरवाव्यात, ध्वजारोहण कधी करावे
याबाबत सूचना देण्यात आल्या असल्या तरी या पत्रकावर शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा, शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक हारून आतार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने चौकशीचे काम सुरू केले असताना, दबाव तंत्राचा एक भाग म्हणून शिक्षण विभागातील अधिकारी सामूहिक रजेवर गेल्याचे सांगण्यात आले.
राज्यातल्या सर्व जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी सध्या सामूहिक रजेवर आहेत. बोगस शिक्षक भरती, शालार्थ प्रक्रियेत बोगस माहिती भरून शिक्षक भरती झाल्याचा आरोप राज्यातील वेगवेगळ्या भागातून होत आहे. राज्य शासनाने यासंदर्भात एसआयटी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाला कारवाईपासून थांबवावे, खातेनिहाय चौकशी करून मगच कारवाई करावी, अशी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी हे अधिकारी सामूहिक रजेवर आहेत.