

नांदेड : बारावीच्या जीवशास्त्र विषयाची बुधवारी (दि.25) परीक्षा झाली यावेळी किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील परीक्षा केंद्रावर बाहेरच्या व्यक्तींचा वावर आढळल्याने केंद्र चालकांनी संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दिली असून, सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच नायगाव तालुक्यातील दोन परीक्षार्थींना कॉपी करताना पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यात सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू असून, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यातूनही कुठे गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच परीक्षा केंद्रावर बाहेरील व्यक्ती आढळल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिले आहेत. बुधवारी किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील परीक्षा केंद्रावर बाहेरच्या व्यक्तींचा वावर आढळल्याने संबंधितांवर आता कारवाई होणार असून, सिंदखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.
नायगाव तालुक्यात नरसी येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. संबंधित विद्यार्थ्यावर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी यांनी माहूर येथील जगदंबा उच्च माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली असता एका विद्यार्थ्यावर गैरप्रकार प्रकरणी कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील 109 केंद्रांवर आज सुरळीतपणे परीक्षा पार पडली. एकूण 21 हजार 937 परीक्षार्थींपैकी 21 हजार 550 विद्यार्थी उपस्थित राहिले असून, उपस्थितीचे प्रमाण 98.24 टक्के नोंदविण्यात आले.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या सहाय्याने संपूर्ण वेळ परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व 109 केंद्रांवर परीक्षा शांततापूर्ण व कॉपीमुक्त वातावरणात पार पडत आहे. दरम्यान, दहेली तांडा परीक्षा केंद्रावरील बाहेरील व्यक्तींवरील ही जिल्ह्यातील अशी पहीली कारवाई होणार आहे.
बुधवार 25 फेबुवारी रोजी जीवशास्त्राच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे 62 अधिकारी हे 62 केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. शिक्षण विभागाचे 7 अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी अशा एकूण 40 व इतर अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत 109 केंद्रांवर देखरेख ठेवली.
परीक्षा केंद्रावर बाहेरचे व्यक्ती
दरम्यान किनवट येथील दहेली तांडा या परीक्षा केंद्राबाहेर काही अज्ञात व्यक्ती आढळून आल्याने त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींविरोधात सिंदखेड पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती दहेली तांडा परीक्षा केंद्राचे संचालक यांनी दिली.
दोन परीक्षार्थींवर कारवाई
नायगाव तालुक्यात नरसी येथील राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. संबंधित विद्यार्थ्यावर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार अरुणा सूर्यवंशी यांनी माहूर येथील जगदंबा उच्च माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली असता एका विद्यार्थ्यावर गैरप्रकार प्रकरणी कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी कर्डिले परीक्षा केंद्रावर
कंधार तालुक्यात पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रास भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. ते या केंद्रावर पेपर संपेपर्यंत उपस्थित होते. त्यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हेही उपस्थित होते.
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा
दहावी-बारावीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होत असून, विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. उर्वरित परीक्षाही अशाच पारदर्शक, शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.