

'B.Sc' girl rejected; farmer husband accepted by 'M.Sc' girl
नांदेड, पुढारी वृत्तसेवा ३५ एकर बागायती शेतीचा मालक असलेला वाणिज्य पदवीधर शेतकरी मुलगा एमएस्सी उत्तीर्ण मुलीने नवरा म्हणून स्वीकारला. येत्या १२ जुलै रोजी हा विवाह सोहळा होत आहे. विशेष म्हणजे विज्ञान पदवीधर मुलीने 'शेतकरी नवरा... नको गं बाई' असे म्हणत नाक मुरडले होते.
आजच्या उपवर मुलींवर 'पॅकेज सिस्टम'चा जबरदस्त पगडा आहे. काही लाखांमधील पॅकेजचे वर्गीकरण आणि उत्पन्नाच्या तुलनेत होणारा खर्च कोणी पहायला तयार नाही. मुलींना विभक्त कुटुंब पद्धतीत राजा राणीसारखे राहायला आवडते, त्यातही त्यांची प्रथम व अंतिम पसंती पुणे, मुंबई, बंगळुरू अशी शहरे असतात. उच्च विद्याविभूषित मुलींना तर परदेशी वास्तव्याचे स्वप्न पडतात.
बदललेल्या काळात मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. मुलांना घर चालवताना आर्थिक उत्पन्नात वाटा उचलावा लागतो. त्यामुळे ते फार फक्त शिक्षण घेऊ शकत नाहीत. या व अशा एकंदर परिस्थितीत विना विवाह राहिलेल्या मुलांची संख्या वाढत चालली आहे.
मराठवाड्यासारख्या भागात मुलांचा विवाह ही सामाजिक समस्या होऊन बसली आहे. शिकलेल्या मुली शेतकरी नवरा किंवा ग्रामीण भागात सरकारी किंवा खासगी नोकरी करणारा मुलगा पसंत करीत नाहीत. त्यातल्या त्यात शेतकऱ्याची अवस्था तर अतिशय वाईट. पूर्वी साटेलोटे नावाचा एक प्रकार होता. पण शेतकरी मुलाच्या बाबतीत तोसुद्धा उपयोगी पडत नाही. कारण शेतकरी किंवा त्याची मुलगी यांनासुद्धा शेतकरी मुलगा नको अशी स्थिती आहे.
वरील सर्व परिस्थितीत एक दिलासादायक विवाह सोहळा होऊ घातला आहे. ३५ एकर बागायती शेती, त्यात केळी व हळद हे नगदी पीक, वर्षाकाठी सुमारे १ कोटी रुपयांचे उत्पन्न, गावात सुमारे पाच हजार स्क्वे. फूटवर दुमजली टुमदार घर, निर्व्यसनी अशा संस्कारी शेतकरी मुलाला गावातीलच एका विज्ञान पदव्युत्तर मुलीने नवरा म्हणून पसंती दिली आहे. येत्या १२ जुलै रोजी दोघेही विवाहबद्ध होत आहेत.