

Maharashtra Seven Generations History
प्रशांत भागवत
उमरखेड : स्वतःचे मूळ, पूर्वज, कुलपरंपरा आणि कुटुंबाचा इतिहास जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. मात्र बदलत्या काळात आणि वेगवान जीवनशैलीत आपल्या वंशावळीचा मागोवा घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. एकेकाळी गावोगावी फिरून कुटुंबांच्या सात ते दहा पिढ्यांचा इतिहास जतन करणारी ‘भाट’ ही परंपरा आता अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रातील विविध समाजांमध्ये भाट हे वंशावळींचे पारंपरिक संरक्षक म्हणून ओळखले जात. ठराविक कालावधीनंतर ते प्रत्येक कुटुंबाला भेट देत आणि त्या कुटुंबाच्या पिढ्यान्पिढ्यांच्या नोंदी अद्ययावत करत असत. मूळ गाव, पूर्वजांची नावे, स्थलांतराचा इतिहास, कुलदैवत, विवाह, जन्म-मृत्यू यांसारखी महत्त्वाची माहिती ते आपल्या पोथ्या आणि मोडी लिपीतील बाडांमध्ये काळजीपूर्वक नोंदवत. अनेकदा सात ते दहा पिढ्यांचा इतिहास त्यांच्या नोंदींमध्ये सुरक्षित जतन झालेला असे.
आजच्या डिजिटल युगात या परंपरेचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवते. अनेकांना आपल्या पणजोबांपलीकडील पिढ्यांची माहितीही उपलब्ध नसते. अशा वेळी भाटांच्या पोथ्या शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा मागोवा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. कुटुंबांचे स्थलांतर, मूळ गावे, सामाजिक संबंध, परंपरा आणि कुलदैवतांची माहिती या नोंदींमधून उलगडते.
मात्र, आधुनिकतेच्या प्रवाहात ही समृद्ध परंपरा वेगाने लुप्त होत आहे. भाट समाजातील नव्या पिढीला गावोगावी फिरून वंशावळींचे जतन करण्यामध्ये फारसा रस राहिलेला नाही. दुसरीकडे, मोडी लिपी वाचणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याने जुन्या पोथ्या आणि बाडांमधील माहिती वाचणे आणि जतन करणेही अवघड बनले आहे. अनेक ठिकाणी या अमूल्य नोंदी जीर्ण अवस्थेत पडून असून काही ठिकाणी त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीला ‘भाट’ ही संकल्पनाच अपरिचित वाटते. अनेकांनी या परंपरेबद्दल केवळ ऐकून माहिती घेतली आहे; प्रत्यक्ष वंशावळ सांगणारे भाट पाहण्याचा अनुभव त्यांना नाही. परिणामी अनेक कुटुंबांचा शेकडो वर्षांचा इतिहास काळाच्या ओघात कायमचा हरवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इतिहास संशोधकांच्या मते, भाटांच्या पोथ्या या केवळ वंशावळींच्या नोंदी नसून समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक प्रवासाची जिवंत साक्ष आहेत. स्थलांतराचे प्रवाह, समाजरचना, रूढी-परंपरा आणि कुटुंबव्यवस्थेतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो.
यामुळे या वारशाच्या संवर्धनासाठी तातडीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक संघटना आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन भाटांच्या पोथ्यांचे डिजिटायझेशन, मोडी लिपीतील नोंदींचे संगणकीकरण आणि शास्त्रीय पद्धतीने जतन करण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून भविष्यातील पिढ्यांना आपल्या इतिहासाशी जोडून ठेवणे शक्य होईल.
सात पिढ्यांचा इतिहास जपणारी भाट परंपरा ही भारतीय लोकसंस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे संवर्धन करण्यासाठी आजच ठोस पावले उचलली नाहीत, तर पुढील काही वर्षांत भाट आणि त्यांच्या पोथ्या केवळ इतिहासाच्या पानांमध्येच उरतील, अशी खंत जाणकार व्यक्त करत आहेत.