

Deglur Police Missing Mobile Phones Recovered
देगलूर : देगलूर पोलीस स्थानकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत २५ गहाळ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत ३ लाख ७४ हजार ५०० रुपये इतकी आहे.
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत गहाळ मोबाईल प्रकरणांचा आढावा घेत तांत्रिक तपासाला गती दिली.
सीईआयआर (CEIR) पोर्टल, आयएमईआय (IMEI) ट्रॅकिंग प्रणाली तसेच विविध मोबाईल सेवा प्रदात्यांकडून प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. या मोहिमेत मोबाईल शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल के. जी. तलवारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच देगलूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून मोबाईल हस्तगत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे विविध ठिकाणांहून ओप्पो, व्हिवो, रियलमी, सॅमसंग, रेडमी, मोटोरोला, टेक्नो आणि लावा या कंपन्यांचे २५ मोबाईल शोधून काढण्यात आले. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर संबंधित फिर्यादींना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गहाळ मालमत्ता शोधण्यामध्ये देगलूर पोलिसांनी केलेली ही कामगिरी नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे. या यशस्वी मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल के. जी. तलवारे तसेच डी.बी. पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.