

भोकर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूर्वजांनी सहकार चळवळ उभी केली. सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती लाभ मिळतो हे महत्त्वाचे आहे. मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल. सहकार क्षेत्रामुळेच महाराष्ट्राची जगात वेगळी ओळख निर्माण झाली, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भोकर येथे व्यक्त केले.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नांदेड, च्या भोकर शाखेच्या नवीन वास्तुच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी 24 एप्रिल रोजी दुपारी संपन्न झाले. उद्घाटनप्रसंगी मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात मंचावर बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्रीजया चव्हाण, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार तथा बँकेचे उपाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, भाऊराव चव्हाण कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, संचालक कैलास गोरठेकर, गोविंदराव नागेलीकर, संचालक बाळासाहेब रावणगावकर, सविता मुसळे, सभापती जगदीश पा. भोसीकर, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, उपनिबंधक शंभूराज हिरे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शंकरराव चव्हाण, सहकारमहर्षी पद्मश्री कै श्यामराव कदम, उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गिताने झाली. पुढे बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, सहकारी बँका चालविण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यातरी त्या अडचणींवर मात करून नांदेड जिल्हा बँकेने प्रगती केली आहे.
आगामी काळात बिंदू नामावली प्रमाणे पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची व तंत्रज्ञानासह खताचा वापर करावा. इतर बँकेकडे न वळता शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे वळावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले. प्रास्ताविक बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ अजय कदम यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. संतोष देवराये यांनी केले. संचालक रामचंद्र मुसळे यांनी आभार मानले.
बँकेच्या विकासात खारीचा वाटा - खा. अशोकराव चव्हाण
जिल्हा बँकेच्या भोकर शाखेच्या इमारतीसाठी भोकर बाजार समितीने विनामूल्य जागा दिल्याबद्दल सभापती जगदीश पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे खा. चव्हाण यांनी आभार मानले. जिल्हा बँक डबघाईस आली होती तेंव्हा मंत्री मंडळाने बँक बंद करण्याच्या बाजूने होते. मात्र असे झाले तर शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान होईल म्हणून बँकेला जिवंत करण्याची विनंती करीत गॅरंटी घेतली. मुख्यमंत्री असताना 125 रुपयांच्या कर्जाचे रुपांतर अनुदानात केल्यामुळे बँक टिकली. त्यामुळे या बँकेच्या विकासात माझा खारीचा वाटा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. बँकेचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी बँक नफ्यात आणून बँकेला चांगले दिवस आणल्याबद्दल समाधान व्यक्त केले.