Ashok Chavan : जिल्हा बँकेच्या शासकीय कर्जाचे मीच अनुदानात रूपांतर केले!

खा.अशोक चव्हाण यांचा राजकीय विरोधकांना टोला
Ashok Chavan Nanded bank statement
Ashok Chavanpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मी काय केले, असे काही जण म्हणतात. त्यांना उत्तर द्यायचेच झाले, तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या बँकेला शासनाकडून कर्ज स्वरूपात दिलेल्या 120 कोटी रूपयांचे अनुदानात रूपांतर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री असताना मीच घेतला होता, अशा शब्दात खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या विरोधकांस टोला लगावला आहे.

नांदेड जिल्हा बँकेच्या भोकर येथील शाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन खा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. श्रीजया चव्हाण, संचालक बाळासाहेब रावणगावकर, कैलास गोरठेकर, गोविंदराव नागेलीकर, सविता मुसळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम, अमरनाथ राजूरकर प्रभृती उपस्थित होते.

Ashok Chavan Nanded bank statement
नांदेड-बिदर रेल्वेमार्गासाठी चव्हाण-विजयेन्द्र यांची चर्चा !

वरील कार्यक्रमात बँकेच्या मागील काळातील बिकट परिस्थितीचा उल्लेख झाला. या बँकेला उभारी देण्यामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील तेव्हाचे ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांची मदत झाल्याचे अजय कदम यांनी प्रास्ताविकात तसेच सविता मुसळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले; पण आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या भाषणात अशोक चव्हाण यांचा उल्लेख टाळून विलासरावांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला. जोपर्यंत ही बँक अस्तित्वात आहे, तोपर्यंत विलासरावांचे उपकार आपल्याला विसरता येणार नाहीत, असे चिखलीकर यांनी भाषणादरम्यान नमूद केले.

नंतर बॅँकेचे अध्यक्ष खतगावकर यांनी जुना संदर्भ देत बँकेला वाचविण्यात विलासराव देशमुख व अशोक चव्हाण या दोघांचाही वाटा असल्याचे निःसंदिग्धपणे सांगितले. अध्यक्षीय समारोपात खा. चव्हाण यांनी चिखलीकरांचा उल्लेख टाळून बँकेसाठी आपण काय केले, ते ठासून सांगितले. विलासरावांनी केलेली मदत कर्ज स्वरूपातील होती. त्यांच्या नंतर मुख्यमंत्रीपद मला मिळाल्यावर काही महिन्यातच मी शासनाच्या त्या कर्जाचे रूपांतर अनुदानात केल्यामुळे बँकेला शासनाची रक्कम फेडावी लागली नाही, याकडे चव्हाण यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

Ashok Chavan Nanded bank statement
Nanded News : जिल्हा बँकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला : चव्हाण

2021 सालात झालेल्या निवडणुकीत माझ्या नेतृत्वाखालील गटाला बँकेमध्ये बहुमत मिळाले. आधी वसंतराव चव्हाण आणि त्यांच्या नंतर भास्करराव खतगावकर बँकेचे अध्यक्ष झाले. आमच्या गटाच्या कार्यकाळात ही बँक संचित तोट्यातून बाहेर आली. गेल्या आर्थिक वर्षात बँकेला 7 कोटींचा निव्वळ नफा झाला, ही आनंदाची बाब असल्याचे खा.चव्हाण यांनी नमूद केले.

नोकरभरतीच्या विषयावर संचालक गप्प!

वरील कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या मागील 10 वर्षांतील एकंदर कारभारावर चर्चा झाली. विद्यमान संचालक मंडळाच्या अखेरच्या काळात बँकेतील नोकरभरतीचा विषय सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी मार्गी लावून दिला होता. पण भरतीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच संचालकांनी 156 जागांची आपसांत वाटणी करून घेतल्याची बाब उघड झाल्यानंतर शासनाने त्याची गंभीर दखल घेतली. संचालक मंडळाने सुरू केलेली प्रक्रिया सहकार विभागाने तात्काळ थांबविली; पण भोकर येथील कार्यक्रमात संचालकांनी नोकरभरतीच्या विषयाला स्पर्श करण्याचे टाळले, तर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बँकेतील नोकरभरती पारदर्शीपणे होण्यासाठी शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयाची माहिती उपस्थितांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news