

जळकोट : जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली असून येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजताच तालुक्यात निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली आहे. तहसीलदार राजेश लांडगे यांनी तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांची तातडीची बैठक तहसील कार्यालयात घेऊन निवडणूकीच्या दृष्टीने पूर्वतयारीचा आढावा घेतला.
निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याने आचारसंहितेची तालुक्यात प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी सतर्क राहावे असे निर्देश तहसीलदार राजेश लांडगे यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिले. शौचालय, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, रॅम्प, सुरक्षा भिंत इत्यादी सोयी सुविधायुक्त खोल्या मतदान केंद्रासाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अधिकारी - कर्मचारी नियुक्ती, अधिकारी - कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण, व्हीडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, भरारी पथक, चेक पोस्टसाठी पथक, तक्रार निवारण कक्ष याचे नियोजन करण्यात आले. निवडणूक खर्च अहवाल दाखल करणे, स्ट्राँगरुम, मतमोजणी कक्ष यांच्यासाठी इमारतीची पाहणी करण्यात आली. मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी मतदार जनजागृती व शिक्षण यावर भर देण्यात यावा, असे निर्देश यावेळी तहसीलदार राजेश लांडगे यांनी उपस्थित अधिकारी - कर्मचारी यांना दिले.
तहसील कार्यालय प्रांगणात असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये स्ट्राँगरुम, मतमोजणी व निवडणूक यंत्रणा कक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने तहसीलदार राजेश लांडगे व संबंधित अधिकारी यांनी संपूर्ण इमारतीमध्ये फिरुन पाहणी केली.
या बैठकीस नायब तहसीलदार रंगनाथ कराड, नायब तहसीलदार सुहास मुळजकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी अर्पण राऊत, मंडळ अधिकारी हंसराज जाधव, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद सूर्यवंशी, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे सचिव अतीक शेख, ग्राम महसूल अधिकारी कुंदन लोखंडे, नागेश हारणे, बाळेराज बर्गे, महादेव पाटील, बाळासाहेब बोईनवाड, आकाश पवार, परशुराम जानतिने, लक्ष्मण अटकळे, प्रसाद पाटील, भावना भेंडेकर, महसूल सहाय्यक देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुधाकर बुक्के, नारायण रेणकुंटवार, डाटा आपरेटर अलीम शारवाले, माधव सातापुरे, कोंडिबा गवळे यांची उपस्थिती होती.