

Ancient idol found at Nandagiri Fort
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : येथील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाकडून सुरू असलेल्या खोदकामादरम्यान हेमाडपंथी कालखंडातील एक दुर्मीळ मूर्ती आढळून आली आहे. राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने येथील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्याच्या पुनर्विकासाचे काम गतीने सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरात खोदकाम सुरू आहे. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी किल्ल्याच्या उत्खननात हेमाडपंथी कालखंडातील एक दुर्मीळ मूर्ती आढळून आली आहे अशी माहिती नंदगिरी किल्याचे किल्लेदार जयेश भरने यांनी दिली आहे.
या अनोख्या शोधामुळे नंदगिरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले असून स्थानिक इतिहासप्रेमी व पुरातत्त्व जाणकारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मूर्तीचा पुढील अभ्यास, संवर्धन आणि मूळ माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुनर्विकासाचे हे खोदकाम आणखी काही महिने सुरू राहणार असून भुयारी मार्गाच्या खोदकामाच्या सुरुवातीलाच कोरीव नक्षीकाम अस-लेली ही मूर्ती आढळून आली. भुयारी मार्गाचे आणखी बरेच काम सुरू रा-हणार आहे त्यामुळे पुरातन काळातील अनेक शिल्पं, विविध प्रकारचे पुरातन काळातील दगड आणि नक्षीकाम असलेल्या मुर्त्या सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मूर्तीच्या संशोधनासाठी पुरातत्व विभागाची टीम नंदगिरी किल्ल्यावर येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नंदागिरी किल्याच्या नदीकडील भुयारी मार्गाच्या चढावरील माती आणि दगड काढत असताना बाजूच्या दगडी भिंतीला लावलेली ही शिळा होती. मूर्तीचा भाग आतील बाजूने होता. दगडी भिंतीला ही दगडी शिळा बसवण्यासाठी सिमेंटचा वापर सुद्धा करण्यात आला होता. जेसीबीच्या सहाय्याने ती शिळा बाहेर काढण्यात आली.