

NCP has more candidates in the district than BJP!
विशेष प्रतिनिधी
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: राज्यसभेतील २ खासदार आणि ५ आमदारांसह राज्यातल्या महायुतीत आपले थोरलेपण सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यातील १३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २६९ जागांसाठी २०६ जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. केवळ एकमेव आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २२१ तर त्याखालोखाल काँग्रेसने २१४ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
प्रदीर्घ विश्रांतीनंतर वरील निवडणुकीद्वारे जिल्ह्यात १३ नगराध्यक्ष निवडले जाणार असून या संस्थांत अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांना आपली सारी राजकीय प्रतिष्ठा तसेच शंकररावांची पुण्याई पणास लावावी लागली आहे. विरोधक असलेल्या काँग्रेसपेक्षाही चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या मित्रपक्षांनी जेरीस आणल्याचे दृश्य शेवटच्या टप्प्यात तयार झाले आहे मित्रपक्षांचेच नेते नांदेडमध्ये येऊन चव्हाणांवर टोलेबाजी-शेरेबाजी करून गेले.
येत्या मंगळवारी (दि.२) वरील निवडणुकांसाठी १३ शहरांमध्ये होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असताना नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीमध्ये आपले संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात करारा संघर्ष जारी आहे. या दोघांच्या लढाईत काँग्रेस पक्षही आपला डाव साधण्याच्या प्रयत्नात असला, तरी गेल्या पंधरवड्यात या पक्षाचा एकही अनुभवी नेता जिल्ह्यामध्ये फिरकला नाही.
खा. चव्हाण यांनी भोकर, मुदखेड व हिमायतनगर येथे विशेष लक्ष केंद्रित केले असून चिखलीकर व त्यांच्या पक्षाने लोहा, कंधार, उमरी, धर्माबाद आणि बिलोली पालिकेमध्ये जोर लावला आहे. भाजपाचे चार आमदार आपापल्या कार्यक्षेत्रात विरोधकांवर मात करण्याच्या प्रयत्नांमध्ये एकाकी दिसत आहेत.
वरील निवडणुकांसाठी चिन्हं वाटपाची प्रक्रिया २६ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अधिकृत संख्या समोर आली. सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपाला जेमतेम २०६ उमेदवार उभे करता आले. या पक्षाने हदगाव, बिलोली येथे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले नाहीत. बिलोलीत नगरसेवकपदांसाठी हा पक्ष लढाईतच नाही.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपा सदस्यांचे संख्याबळ आतापर्यंत नगण्य होते. अशोक चव्हाणांसारखा मोहरा या पक्षाच्या गळाला लागल्यानंतर या संस्थांची निवडणूक प्रथमच होत आहे. नगर सेवकांच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा या पक्षाचा प्रयत्न असला, तरी बहुसंख्य ठिकाणी या पक्षाला मित्रपक्षांसोबतच्या लढाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपाला मुदखेड, देगलूर, कुंडलवाडी, मुखेड, उमरी, लोहा आदी नगर परिषदांत नगरसेवकपदाच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत; पण खा. चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील भोकर तसेच हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद, कंधार येथे या पक्षाला सर्व जागा लढवता आलेल्या नाहीत. जिल्ह्यात क्रमांक एकचे स्थान पटकविण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला भोकर, कंधार, उमरी, धर्माबाद, लोहा, बिलोली, कुंडलवाडी इत्यादी ठिकाणी सर्व जागांवर उमेदवार देता आले आहेत.
भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस या पक्षांनाच दोनशेहून अधिक जागांसाठी उमेदवार मिळाले असून देगलूर कंधार येथे कॉंग्रेसला नगराध्यक्षपदासाठी मोठा वाव असल्याचे दिसत आहे. मुदखेड, हिमायतनगर येथेही काँग्रेस पक्ष लढतीत आहे. शिवसेनेने हदगाव, मुखेड, देगलूर, कुंडलवाडी, धर्माबाद, मुदखेड, भोकर या नगरपालिकांमध्ये उमेदवार उभे केले आहेत; पण ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष मर्यादित स्वरूपात निवडणुकीमध्ये आहेत.