

A Daughter of Marathwada Takes Her Seat as a Judge in Canada!
संजीव कुळकणी
नांदेड : छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थिदशेत अभ्यासासह कला, क्रीडा आणि लेखन इत्यादी क्षेत्रांत मुशाफिरी केलेली या शहराची भूमिकन्या अर्चना मेढेकर मराठे आता कॅनडामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावर विराजमान झाली असून नुकताच त्यांचा तेथील पद्धतीनुसार शपथविधी सोहळा पार पडला.
मराठवाड्यतील चित्रमहर्षी, नांदेडचे दिवंगत त्र्यंबकराव वसेकर यांची नात ही अर्चना यांची पहिली ओळख. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तेव्हाच्या औरंगाबादेत झाले. माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण (एलएलबी) पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी तेथील जिल्हा न्यायालयात वकिली केली. न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर, अॅड.पी.एम. शाह यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
विवाहानंतर कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या अर्चना यांनी तेथील यॉर्क विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून 'लॉ फर्म'च्या माध्यमातून वकिली सुरू केली. नंतर त्या तेथेच बॅरिस्टर झाल्या. कॅनडातील सर्वोच्च न्यायालयासह या देशातील ओंटारियोच्या अपील न्यायालयात त्यांनी महत्त्वाचे खटले लढवले. कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या २५ यशस्वी स्थलांतरितांमध्ये मागील काळात त्यांचा समावेश झाला.
ओंटारियोच्या लॉ सोसायटीने त्यांना कुटुंब कायद्यातील तज्ज्ञ म्हणून मान्यता दिली. मागील २० वर्षांत त्यांना त्या देशातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षाच्या अखेरीस अर्चना मेढेकर काही दिवसांसाठी मायदेशात आल्या होत्या. कॅनडामध्ये गेल्यावर काही दिवसांनीच त्यांची न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाल्याची घो-षणा झाली. त्यांचे बंधू डॉ. अमित मेढेकर हे पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना यांची नियुक्ती फोर्ट फ्रान्सिस केनोरा येथे करण्यात आली आहे.
या बहुमानानंतर छत्रपती संभाजीनगर व ठिकठिकाणच्या हितचिंतकांनी अर्चना मेढेकर यांचे अभिनंदन केले होते. त्यांचे वडील अरुण रामचंद्र मेढेकर हे निवृत्त बँक अधिकारी असून आई चित्रलेखा मेढेकर ह्या दीर्घकाळ कलाध्यापिका होत्या. आपल्या कन्येच्या शपथविधी सोहळ्यास मेढेकर दाम्पत्य उपस्थित होते. हा शपथविधी सोहळा अत्यंत शिस्तीत तसेच हृद्य वातावरणात पार पडला, असे अरुण मेढेकर यांनी कळविले आहे.