Chhatrapati Sambhajinagar News : जलसंपदात कामाआधीच कंत्राटदार फायनल

निविदा उघडण्यापूर्वी ठेकेदाराचे न्यायालयात कॅव्हेट
Chhatrapati Sambhajinagar News
जलसंपदात कामाआधीच कंत्राटदार फायनल pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर ः जलसंपदाच्या बहुतांश निविदांमध्ये निविदा उघडण्यापूर्वीच ठेकेदार फायनल झालेला असतो. एका ठेकेदाराने आष्टी तालुक्यातील एका कामाच्या निविदेची आर्थिक बोली उघडण्यापूर्वीच आपल्या विरोधात कुणी न्यायालयात दाद मागू नये, यासाठी कॅव्हेट दाखल केल्यामुळे हा प्रकार चव्हाट्यावर आला. अधिकारी आणि ठराविक ठेकेदारांच्या या रिंगची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.

त्याचे झाले असे की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाअंतर्गत उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प 3 व 4 च्या सर्वेक्षण- अन्वेक्षणाची निविदा गतवर्षी जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता, नांदूर-मधमेश्वर कालवा विभाग 2 ने जारी केली होती. 2 कोटी 11 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाचे हे काम होते. याच आठ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

Chhatrapati Sambhajinagar News
Sambhajinagar News : निविदा मागे घेण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींच्या नावे दबाव

24 सप्टेंबर 2025 रोजी या निविदेत सहभागी झालेल्या आठही स्पर्धकांचे तांत्रिक मुल्यांकन लिफाफे उघडण्यात आले. त्यात पाच कंपन्यांना कागदोपत्री त्रुटी दाखवून बाद ठरविण्यात आले, तर वर्कमेट्स या संभाजीनगरातील कंत्राटदार कंपनीसह तिघांना पात्र ठरविण्यात आले. यावेळी आपल्याला चुकीच्या पद्धतीने अपात्र करण्यात आले, याविरोधात आपण न्यायालयात दाद मागू, अशी भूमिका पुण्यातील मंडलिक इन्फ्राकॉन या कंपनीने घेतली.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी 25 स्पटेंबर रोजी वर्कमेट्स या कंपनीने खंडपीठात या निविदेबाबत कॅव्हेट दाखल केले. आमचे म्हणणे ऐकल्या शिवाय न्यायालयाने या कामाला व आपच्या पात्रतेला स्थगिती देऊ नये, असे वर्कमेट्सचे म्हणणे होते.

जर आर्थिक बोलीची लिफाफे उघडलेले नाहीत, आपल्यासोबत पात्र ठरलेल्या अन्य दोन स्पर्धकांनी भरलेला दर आपल्यापेक्षा जास्त आहे की कमी, हे स्पष्ट झालेले नाही, मग असे असतानाही वर्कमेट्सला या निविदेत आपणच पात्र आहोत, हे कळालेच कसे? 26 स्पटेंबर रोजी आर्थिक बोलीचे लिफाफे उघडण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar News
AIMIM corporator viral video : जुन्या शहराचे महापौर, खासदार-आमदार इम्तियाज जलीलच

त्याच्या एक दिवस आधीच वर्कमेट्सने कॅव्हेट दाखल केले, याचा अर्थ हे काम त्यांनाच मिळणार हे निश्चीत होते, अशी शंका स्पर्धक कंपनी असलेल्या मंडलिक इन्फ्राकॉनला आली. त्यानंतर मंडलिक इन्फ्राकॉनने जलसंपदाच्या मुख्य सचिवासह अनेकांकडे याबाबत हरकती दाखल करीत दाद मागितली; परंतु त्यांना अद्याप काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.

अधीक्षक अभियंत्याविरुद्ध गंभीर आरोप

मंडलिक इन्फ्राकॉनने आपल्याविरुद्ध झालेल्या या अन्यायाबाबत केलेल्या तक्रारील अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशाच पद्धतीने अनेक टेंडर मॅनेज करून शिंगाडे यांनी वर्कमेट्स कंपनीला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची कामे मिळवून दिली आहेत. वर्कमेट्स या कंपनीत ते अप्रत्यक्ष भागिदार आहेत, अशी मंडलिक इन्फ्राकॉनने मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. या सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी तक्रारीद्वारे केलेली आहे.

शासनाला 40 लाखांचा चुना

आष्टीच्या या निविदेत शासनाला जलसंपदाच्या अधिकारी व संबधित ठेकेदारांनी मिळून जवळपास 40 लाख रुपयांना चुना लावला आहे. 2 कोटी 11 लाख अंदाजपत्रकाचे हे काम वर्कमेट्सला 2 कोटी 6 लाख 64 हजारांत देण्यात आले. आपण या कामासाठी 23 टक्के कमी दराने म्हणजेच सुमारे 1 कोटी 65 लाख या दराने भरलेली होती; आम्ही कमी दराने असल्याची चाहूल लागल्यामुळे किरकोळ त्रुटी दाखवून आम्हाला अपात्र ठरविल्याचा आरोप मंडलिक यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केला. विशेष म्हणजे याच निविदातील दुसरी स्पर्धक कंपनी असलेल्या यश इंजिनिअर्स या कंपनीनेही या निविदेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार दिलेली आहे. त्यावरही काहीच हालचाल झालेली नाही. यावरून या गोष्टी वरपर्यंत मॅनेज होत असल्याचे आरोप समोर येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news