

नांदेड : सततची छेडछाड आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अर्धापूर तालुक्यातील कासारखेडा येथे घडली. याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालेगाव येथील एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ सूर्यकांत बेंद्रे (रा. मालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभ बेंद्रे हा पीडित मुलीची वारंवार छेड काढत होता आणि तिला मानसिक त्रास देत होता. या जाचाला कंटाळून अखेर मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये सौरभच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे.
याप्रकरणी मुलीचे वडील राष्ट्रपाल झिंजाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सौरभ बेंद्रे याच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे स्वतः करत आहेत.