

बीड : बीडकरांना माझ्याकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. गतकाळात काय झाले ते विसरून आता आपल्याला पुढे जायचे आहे. विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, पण कामाचा दर्जा राखला गेलाच पाहिजे. मी बीडकरांचा भ्रमनिरास होऊ देणार नाही,“ अशी खंबीर ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
गुरुवारी (दि. 1) बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर विविध विकासकामांच्या प्रशासकीय मान्यता पत्रांचे वाटप आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खा. बजरंग सोनवणे, आ. प्रकाश सोळंके, आ. विजयसिंह पंडित, आ. सुरेश धस, आ. विक्रम काळे, आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
आमचं सगळं चांगलं चाललंय!
या कार्यक्रमास मंत्री पंकजा मुंडे, कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि आ. नमिता मुंदडा यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. यावर मिश्किल भाष्य करत अजित पवार यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, आज 1 जानेवारी (नववर्ष) आहे. अनेकजण आपल्या कुटुंबासोबत बाहेर फिरायला जातात. माझा दौरा आधी रद्द झाला होता, पण अचानक 1 तारखेचा ठरला. धनंजयने मला फोन करून सांगितले की तो कुटुंबासोबत बाहेर जात आहे. मी त्याला परवानगी दिली. त्यामुळे धनंजय, पंकजाताई किंवा नमिताताई नाहीत म्हणून काहीतरी बिघडलंय, अशा चर्चा करू नका. आमचं सगळं चांगलं चाललंय, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.