

हिंगोली : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालत असताना, दोन गटांतील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस जमादारावरच 10 ते 12 जणांच्या जमावाने हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली. गुरुवारी (दि. 1) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कमलानगर भागात हा प्रकार घडला. या हल्ल्यात जमादार संजय डोंगरदिवे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात 31 डिसेंबरनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. शहरात बीट मार्शलद्वारे गस्त सुरू होती. दरम्यान, मध्यरात्री 1:30 च्या सुमारास कमलानगर भागात विनोद गोरे व भूषण खिल्लारे या दोन गटांत वाद होऊन हाणामारी सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.
त्यानुसार जमादार संजय डोंगरदिवे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच काही जणांनी तेथून पळ काढला. मात्र, भांडणात दोघे जण जखमी झाल्याचे दिसल्याने डोंगरदिवे यांनी वाहन बोलावून त्यांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. याच वेळी वाद सोडवत असताना अचानक 10 ते 12 जणांच्या टोळक्याने डोंगरदिवे यांच्यावर हल्ला चढविला. गाफील असल्याने त्यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलभ रोहन, पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्यासह जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची कुमक येताच हल्लेखोर पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.